Pune: गणेशोत्सवात मोबाईल चोरणारी परराज्यातील टोळी गजाआड; हडपसर पोलिसांची कामगिरी
By नितीश गोवंडे | Published: September 25, 2023 05:21 PM2023-09-25T17:21:53+5:302023-09-25T17:22:51+5:30
अशा परराज्यातील चोरांना पकडण्यात हडपसर पोलिसांना यश आले असून, या चोरांकडून त्यांनी २० महागडे मोबाइल जप्त केले आहेत....
पुणे : शहरातील प्रसिद्ध गणेशोत्सवादरम्यान गणेश मंडळांचे देखावे पाहण्यासाठी राज्यासह देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक पुण्यात येत असतात. त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होत असते. याचा फायदा घेत काही चोर गणेश भक्तांचे मोबाइल लांबवतात. अशा परराज्यातील चोरांना पकडण्यात हडपसर पोलिसांना यश आले असून, या चोरांकडून त्यांनी २० महागडे मोबाइल जप्त केले आहेत.
कौशल मुन्ना रावत (२१, रा. लखनऊ, उत्तर प्रदेश), संतोषसिंग श्रवण सिंह (२२, रा. झारखंड), जोगेश्वर कुमार रतन महातो (३०, रा. झारखंड), सूरज रामलाल महातो (३०, रा. झारखंड) अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत. तर एका अल्पवयीन मुलाला देखील ताब्यात घेण्यात आले आहे. चोरट्यांनी हे २० मोबाइल शहराच्या मध्यभागातून चोरल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
गणेशोत्सवात होणारी मोबाइल चोरी रोखण्यासाठी हडपसर पोलिसांनी विशेष पथक तयार केले आहे. हे पथक गर्दीमध्ये तैनात असताना पोलिस अंमलदार अजित मदने आणि प्रशांत टोणपे यांना महागडे मोबाइल चोर हडपसर येथील गांधी चौकात थांबले असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सहायक पोलिस निरीक्षक विजयकुमार शिंदे, उपनिरीक्षक अविनाश शिंदे यांच्या पथकाने सापळा रचून चोरट्यांना ताब्यात घेत, त्यांची झडती घेतली. यात ३ लाख ८० हजार रुपयांचे २० मोबाइल आढळले, ते पोलिसांनी जप्त केले. हे आरोपी लखनऊ रेल्वे स्थानकावर एकत्र आले, तेथून रेल्वेने ते पुण्यात आले. आरोपींनी फरासखाना, बंडगार्डन, स्वारगेट आणि हडपसर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून मोबाइल चोरल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.