Pune | रागाच्या भरात चार वर्षांच्या मुलीचा आईनेच केला खून; पुण्यातील धक्कादायक घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2023 08:41 IST2023-03-28T08:40:27+5:302023-03-28T08:41:43+5:30
याप्रकरणी तिची आई कल्पी हिला हडपसर पोलिसांनी ताब्यात घेतले...

Pune | रागाच्या भरात चार वर्षांच्या मुलीचा आईनेच केला खून; पुण्यातील धक्कादायक घटना
पुणे : रागाच्या भरात आईनेच आपल्या चार वर्षांच्या मुलीच्या पोटात चाकूने भोसकून खून केला. हा धक्कादायक प्रकार हडपसरमधील ससानेनगर येथे घडला. वैष्णवी महेश वाडेर असे खून झालेल्या मुलीचे नाव आहे. याप्रकरणी तिची आई कल्पी हिला हडपसर पोलिसांनी ताब्यात घेतले.
याबाबत वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद गोकुळे यांनी सांगितले की, ससानेनगर येथील दूर्वांकर सोसायटीत ही ४३ वर्षांची महिला ४ मार्च रोजी राहायला आली होती. घरात ती व तिची ४ वर्षांची मुलगी दोघीच राहत होत्या. घरात बेकरी पदार्थ बनवून ती विक्री करीत असे. यापूर्वी ती प्रतीकनगरमध्ये राहत होती. घरमालकाने तिला घर खाली करण्यास सांगितले होते.
सोमवारी सायंकाळी घरातून आवाज आल्याने शेजारच्यांनी पाहिले तर तेव्हा दरवाजा बंद होता. त्यांनी दरवाजा वाजविल्यानंतर काही वेळाने तिने दरवाजा उघडला. आत मुलगी रक्तबंबाळ अवस्थेत होती. पोलिसांना याची माहिती मिळाल्यावर ते घटनास्थळी पोहोचले, तेव्हा मुलगी गतप्राण झाली होती. तिच्या आईला ताब्यात घेण्यात आले आहे.