Purandar Vidhan Sabha 2024: पुरंदरमध्ये महायुतीत मैत्रीपूर्ण संघर्षमय लढत; ५० हजार नवमतदारांवर ३ उमेदवारांचे भवितव्य अवलंबून

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2024 04:48 PM2024-11-22T16:48:41+5:302024-11-22T16:49:53+5:30

शिवसेना शिंदे गटाकडून विजय शिवतारे आणि अजित पवार गटाकडून संभाजी झेंडे यांची मैत्रीपूर्ण लढत, तर संजय जगताप आघाडीकडून मैदानात

A friendly skirmish in the Great Alliance at Purandar The fate of 3 candidates depends on 50 thousand new voters | Purandar Vidhan Sabha 2024: पुरंदरमध्ये महायुतीत मैत्रीपूर्ण संघर्षमय लढत; ५० हजार नवमतदारांवर ३ उमेदवारांचे भवितव्य अवलंबून

Purandar Vidhan Sabha 2024: पुरंदरमध्ये महायुतीत मैत्रीपूर्ण संघर्षमय लढत; ५० हजार नवमतदारांवर ३ उमेदवारांचे भवितव्य अवलंबून

जेजुरी : पुरंदर विधानसभेसाठी तीन उमेदवाराचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. मात्र, गत निवडणुकीपेक्षा यावेळी ५० हजारांनी मतदारांची संख्या वाढली आहे. एकीकडे तिन्ही उमेदवार विजयाचे आखाडे जरी बांधत असले तरी हे नवमतदारच विजयी उमेदवाराचे भवितव्य ठरवणार आहेत. दुसरीकडे महायुतीतील मैत्रीपूर्ण संघर्षमय लढतीचा फायदादेखील महाविकास आघाडीने उचलला आहे. त्यामुळे मतदारांनी आपले पालकत्व कोणाच्या हातात सुपूर्द केले आहे. हे येत्या २३ तारखेला दुपारपर्यंत स्पष्ट होणार आहे.

संपूर्ण मतदारसंघात आडाखे आणि तडाखे कसे असतील? याचीच चर्चा पारापारांवर सुरू आहे. या निवडणुकीत एकूण ४६४०१७ मतदारांपैकी २८३१६४ मतदारांनी मतदानात सहभाग घेतला आहे. यात १३३७८७ महिला मतदार, १ लाख ४९४७१ पुरुष आणि इतर ६ जणांनी मतदान केले आहे. निवडणुकीत १६ उमेदवार जरी असले तरी ही आघाडी युतीच्याच तीन उमेदवारात जोराची चुरस आहे. आघाडीकडून काँग्रसचे विद्यमान आ. संजय जगताप पुन्हा नशीब आजमावत आहेत. तर युतीच्या दोन उमेदवारात मैत्रीपूर्ण लढत होत आहे. शिवसेना शिंदे गट आणि भाजपकडून माजी मंत्री विजय शिवतारे तर राष्ट्रवादी शरद पवार गटातून ऐनवेळी अजित पवार गटात उडी मारून घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवणारे संभाजी झेंडे निवडणुकीत उतरले आहेत. खरी लढत या तिघांतच होत असल्याने तीन ही उमेदवारांकडून विजयाची खात्री व्यक्त होत आहे. निवडणूक प्रचारात आघाडीच्या उमेदवाराची प्रचारात आघाडी दिसत होती. त्यामानाने युतीचे उमेदवार विजय शिवतारे आणि त्यानंतर संभाजी झेंडे असा प्रचाराचा क्रम होता. मात्र शेवटच्या दोन दिवसात तीन ही उमेदवारांकडून मतदारांना पैसे वाटप केल्याची मोठी चर्चा सुरू झाली. यात संभाजी झेंडे यांनी आघाडी ठेवल्याची चर्चा आहे. निवडणूक लढवायचीच यासाठी अपक्ष, शेकापचे एबी फॉर्म, नंतर घड्याळ चिन्हासाठी अजित पवार गटाचा एबी फॉर्म मिळवून रंगत आणली होती. निवडून यायचेच यासाठी सर्व प्रयत्न करण्यात आल्याने मतदानादिवशी त्यांचीच चर्चा अधिक होती. मात्र मतदारांनी त्यांना कितपत स्वीकारले आहे, आणि ते कोणाचे मतदान खाणार यावर युतीचे शिवतारे की आघाडीचे संजय जगताप यांचे भवितव्य ठरणार असल्याची चर्चा राजकीय गोटातून सुरू आहे. यामुळेच तीनही उमेदवार संभ्रमावस्थेत आलेले आहेत.

संजय जगताप यांचा पाच वर्षांचा लोकांशी असणारा संपर्क, सुप्रिया सुळे आणि शरद पवारांसह गटाची साथ त्यांना निवडणुकीत यश मिळवून देणार असल्याचा आघाडीचा कयास आहे. तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणि भाजपची साथ शिवतारे यांनाच फायदा होणार असल्याचा त्यांच्या कार्यकर्त्यांचा आडाखा आहे. तर नातीगोती माजी सनदी अधिकारी, अजित पवारांची साथ खर्चाची तमा न बाळगता केलेला मोठा खर्च संभाजी झेंडे यांना तारून नेणार असा त्यांच्या कार्यकर्त्यांचा तडाखा दिसत आहे. 

पक्ष विचारांपेक्षा नात्यागोत्यांवर आधारलेली निवडणूक

मतदानाचा टक्का पाहता गेल्या २०१९ विधानसभा निवडणुकीत एकूण दोन लाख ३६ हजार २५३ मतदारांनी मतदान केले होते. यावेळी एकूण मतदानाच्या ६८ टक्के मतदान झाले होते. या निवडणुकीत एकूण दोन लाख ८३ हजार १६४ मतदारांनी मतदान केले असले तरी ही मतांचा टक्का खाली आलेला आहे. एकूण ६१ टक्केच मतदान झालेले आहे. मतांचा टक्का घसरला की विद्यमान लोकप्रतिनिधीला त्याचा फायदा असतो असे गृहितक मांडले जाते. याचा फायदा आघाडीलाच झालेला दिसत आहे. मात्र सुमारे ५० हजार मते वाढलेली असल्याने या नव मतदारांनी कोणती भूमिका घेतलेली असेल यावर या तीन ही उमेदवारांचे भवितव्य अवलंबून राहिले आहे. ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. प्रचारात निवडणुकीचे विविध मुद्दे गाजलेले असले तरी ही बहुतांशी ही निवडणूक पक्ष विचारांपेक्षा नात्यागोत्यावर गेलेली पाहावयास मिळाली. नातीगोती, उमेदवाराचा गेल्या पाच वर्षांतील संपर्क, आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांची असणारी फळीच या निवडणुकीचा निकाल घेणार आहे.

Web Title: A friendly skirmish in the Great Alliance at Purandar The fate of 3 candidates depends on 50 thousand new voters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.