पुण्यात रामटेकडी भागातील पेट्रोल पंपावर दरोड्याआधीच चौघांच्या टोळीच्या मुसक्या आवळल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2024 06:50 PM2024-06-12T18:50:20+5:302024-06-12T18:51:08+5:30

चार दरोडेखोरांना वानवडी पोलिसांनी अटक केली. यावेळी त्यांच्याकडून घातक शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत....

A gang of four men were spotted before the robbery at a petrol pump in Ramtekdi area in Pune | पुण्यात रामटेकडी भागातील पेट्रोल पंपावर दरोड्याआधीच चौघांच्या टोळीच्या मुसक्या आवळल्या

पुण्यात रामटेकडी भागातील पेट्रोल पंपावर दरोड्याआधीच चौघांच्या टोळीच्या मुसक्या आवळल्या

पुणे : रामटेकडी भागातील पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या चार दरोडेखोरांना वानवडी पोलिसांनी अटक केली. यावेळी त्यांच्याकडून घातक शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. आदित्य ऊर्फ गोऱ्या महेंद्र शिंदे (२१, रा. आदिनाथ सोसायटी, रामटेकडी, हडपसर), साहिल खंडू पेठे (२१), नोवेल जॉन वाल्हेकर (१९) आणि सुहाना मुजावर खान (१९, तिघेही रा. तरवडे वस्ती, हडपसर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तसेच त्यांच्या दोन साथीदारांवरदेखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिस अंमलदार संदीप साळवे (३६) यांनी वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आदित्य शिंदे आणि त्याच्या सहकारी हे बुधानी वेफर्स कंपनीच्या बाजूला असलेल्या बाजूच्या जागेत लोखंडी हत्यार दोरी, स्क्रू ड्रायव्हर, आदी घातक शस्त्रे घेऊन थांबले होते. रामटेकडी परिसरात असणाऱ्या एचपी पेट्रोल पंपावरील दरोडा टाकून रोकड लुटण्याच्या तयारीत असल्याची माहिती वानवडी पोलिसांना मिळाली होती. पोलिसांच्या पथकाने आरोपींना सापळा लावून ताब्यात घेतले. त्यांच्याबरोबर असलेले दोन साथीदार पसार झाले असून, त्यांचा शोध घेण्यात येत आहे. चोरट्यांकडून दोन दुचाकीसह ८० हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अटक केलेल्या आरोपींपैकी आदित्य ऊर्फ गोऱ्या शिंदे आणि साहील पेठे हे पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. आदित्य शिंदे याच्यावर वानवडी पोलिस ठाण्यात ठार मारण्याचा प्रयत्न, पोक्सो ॲक्ट, आर्म ॲक्ट असे चार गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. तसेच एप्रिल २०२४ मध्ये त्याला सहा महिन्यांसाठी पुणे जिल्ह्यातून हद्दपार केले होते. हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन करून तो परिसरात फिरत होता; तर आरोपी साहील पेठे याच्यावर वानवडी पोलिस ठाण्यात तीन आणि सिंहगड रोड पोलिस ठाण्यात एक असे एकूण चार गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक (गुन्हे) राजेंद्र करणकोट करत आहेत.

Web Title: A gang of four men were spotted before the robbery at a petrol pump in Ramtekdi area in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.