चायनीज न मिळाल्याने टोळक्याचा तरुणावर कोयत्याने वार; सिंहगड रोड परिसरातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2022 05:50 PM2022-10-20T17:50:46+5:302022-10-20T17:51:39+5:30
ही घटना रायकर मळा येथील वृंदावन सोसायटीचे लेनमध्ये बुधवारी पहाटे एक वाजता घडली....
पुणे : तुझ्यामुळे इकडे आलो. हा चायनीजवाला बंद आहे. आता काय खाऊ. तो चायनीजवाला बंद केलेले असतानादेखील काहीतरी करून देत होता. आता आम्ही उपाशी राहू का, तुला दाखवतोच आता, असे म्हणत टोळक्याने तरुणावर कोयत्याने वार करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
याप्रकरणी संतोष बाळू गायकवाड (वय २८, रा. रायकरमळा, धायरी) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी राजन शहा ऊर्फ पांड्या, रोशन पोकळे, वैभव ऊर्फ गोट्या तरंगे, विक्या चव्हाण यांना अटक करण्यात आली आहे. ही घटना रायकर मळा येथील वृंदावन सोसायटीचे लेनमध्ये बुधवारी पहाटे एक वाजता घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. आरोपी हे मारुती मंदिरासमोरील ड्रॅगन चायनीजवाल्याशी भांडण करत होते. मध्यरात्री हा प्रकार सुरू असल्याने फिर्यादी तेथे गेला. त्याने आरोपींना सिल्व्हरबर्च हॉस्पिटल शेजारच्या चायनीजवाल्याकडे चला. आपण नूडल्स खाऊयात, असे बोलून त्यांना घेऊन तो वृंदावन सोसायटीच्या गल्लीत आला. परंतु, तेथील चायनीज बंद होते. त्यामुळे आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. त्यांच्या जवळील कोयत्याने फिर्यादीच्या डोक्यात वार करून त्याला गंभीर जखमी केले. परिसरात दहशत पसरविल्याने पोलीस उपनिरीक्षक निंबाळकर तपास करीत आहेत.