गुप्तांगात कॅप्सूल लपवून सोन्याची तस्करी करणाऱ्याला कस्टम विभागाने पकडले
By नितीश गोवंडे | Published: September 14, 2023 07:27 PM2023-09-14T19:27:09+5:302023-09-14T19:27:24+5:30
सोन्याची भुकटी असलेले कॅप्सूल गुप्तांगात लपवून तस्करी करणाऱ्याला केंद्रीय सीमाशुल्क विभागाने (कस्टम) लोहगाव आंतरराष्ट्रीय विमानतळावर पकडले.
पुणे : सोन्याची भुकटी असलेले कॅप्सूल गुप्तांगात लपवून तस्करी करणाऱ्याला केंद्रीय सीमाशुल्क विभागाने (कस्टम) लोहगाव आंतरराष्ट्रीय विमानतळावर पकडले. त्याच्याकडून ३३ लाख ३३ हजार रुपयांची ५५५ ग्रॅम सोन्याची भुकटी यावेळी जप्त करण्यात आली. यापूर्वी देखील दुबई येथून अशाचप्रकारे सोन्याची तस्करी करणाऱ्यांना कस्टम विभागाने पकडले होते.
दुबई येथून लोहगाव आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोन इसम आले. त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने तसेच ते विमानतळाबाहेर पडण्यासाठी घाई करत असल्याने, कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांचा त्यांच्यावर संशय बळावला. त्यांनी तात्काळ दोघांना बाजूला घेत त्यांची चौकशी केली. यावेळी सुरूवातीला उडवा-उडवीची उत्तरे देणाऱ्या दोघांना कस्टमच्या अधिकाऱ्यांनी खाक्या दाखवत त्यांची झडती घेतली. यावेळी त्यांच्या गुप्तांगात सोन्याची भुकटी असलेले कॅप्सुल लपवण्यात आल्याचे आढळून आले. या कॅप्सुलमध्ये ५५५ ग्रॅम सोन्याची भुकटी त्यांनी तस्करी करून आणली होती. या जप्त केलेल्या सोन्याची किंमत ३३ लाख ३३ हजार रुपये असल्याची माहिती कस्टमच्या अधिकाऱ्यांनी दिली.