कोथरूडमध्ये मुळशी 'पॅटर्न'ची पुनरावृत्ती; ६ जणांच्या टोळक्याने पाठलाग करत एकाला संपवलं

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2024 05:29 PM2024-05-17T17:29:45+5:302024-05-17T17:31:49+5:30

खून केल्यानंतर आरोपी पसार झाले होते, मात्र यातील सर्वच्या सर्व आरोपीला पोलिसांनी काही तासातच अटक केली

A group of 6 chased and killed one in kothrud | कोथरूडमध्ये मुळशी 'पॅटर्न'ची पुनरावृत्ती; ६ जणांच्या टोळक्याने पाठलाग करत एकाला संपवलं

कोथरूडमध्ये मुळशी 'पॅटर्न'ची पुनरावृत्ती; ६ जणांच्या टोळक्याने पाठलाग करत एकाला संपवलं

किरण शिंदे

पुणे : कुख्यात गुंड शरद मोहोळच्या हत्येनंतर शांत झालेला कोथरूड परिसर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. महिनाभरापूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून डहाणूकर कॉलनी परिसरात एका २२ वर्षीय तरुणाचा अतिशय निर्घृणणे खून करण्यात आला. ६ जणांच्या टोळक्याने कट रचून घेरले आणि त्यानंतर कोयत्याने सपासप वार करत खून केलाय. गुरुवारी मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास हा संपूर्ण प्रकार घडला. खून केल्यानंतर आरोपी पसार झाले होते. मात्र यातील सर्वच्या सर्व आरोपीला पोलिसांनी काही तासातच अटक केली. 

श्रीनु शंकर विसलावत (वय २२, लक्ष्मीनगर, डहाणूकर कॉलनी, कोथरूड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. सचिन जाधव, बबल्या उर्फ अथर्व शेळके, प्रकाश अनंतकर (तिघेही लक्ष्मीनगर, डहाणूकर कॉलनी, कोथरूड), यश माने, गौरव माने आणि प्रणव कदम अशी आरोपींची नावे आहेत. एका अल्पवयीन तरुणाने याप्रकरणी तक्रार दिली असून अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, आरोपी सचिन जाधव आणि श्रीनु या दोघांचे महिन्याभरापूर्वी कर्वेनगर येथील उड्डाणपुलाखाली भांडण झाले होते. त्यावेळी श्रीनु याने सचिन जाधव याला मारले होते. याच भांडणाचा राग सचिन जाधव यांच्या मनात होता. आणि त्यातूनच हा संपूर्ण प्रकार घडला. गुरुवारी रात्री ११:४५ वाजण्याच्या सुमारास सीनू हा फिर्यादी सोबत डहाणूकर कॉलनी येथील लेन नंबर ३ जवळील रिक्षा स्टॅन्ड जवळ बोलत उभा होता. त्यावेळी आरोपी गौरव माने यश माने आणि प्रणव कदम यांनी दुचाकीवरून येऊन फिर्यादी यांच्या मोपेड स्कूटरला धडक दिली. त्यानंतर आरोपींनी दोघांवरही कोयत्याने वार करण्यास सुरुवात केली. 

दरम्यान कोयत्याचा घाव फिर्यादी यांच्या हातावर लागल्याने फिर्यादी हे घाबरून लक्ष्मी नगरच्या दिशेने पळत गेले. कोयत्याने वार होत असल्याने श्रीनु घाबरून पळत सुटला. त्यावेळी आरोपींनी पाठलाग करून केकवाला दुकानासमोर त्याला गाठले. आणि कोयत्याने सभासप वार करून त्याचा खून केला. खून करून आरोपी पसार झाले होते. मात्र घटनेची माहिती मिळाल्यानंतर पुणेपोलिसांनी नाकाबंदी करत सर्वच्या सर्व म्हणजे सहाही आरोपींना रात्री उशिरा ताब्यात घेतले होते. अलंकार पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनीता रोकडे करत आहेत.

Web Title: A group of 6 chased and killed one in kothrud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.