महाविदयालयीन मुलांच्या टोळक्याने युवकाला बेशुद्ध पडेपर्यंत केली मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2022 04:38 PM2022-10-23T16:38:51+5:302022-10-23T16:39:04+5:30

बाजीराव रोडवरील नु म वी कॉलेजसमोरील प्रकार : खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल

A group of college boys beat up the youth until he fell unconscious | महाविदयालयीन मुलांच्या टोळक्याने युवकाला बेशुद्ध पडेपर्यंत केली मारहाण

महाविदयालयीन मुलांच्या टोळक्याने युवकाला बेशुद्ध पडेपर्यंत केली मारहाण

googlenewsNext

पुणे : कॉलेज सुटल्यावर एका टोळक्याने एकाला ओंकार पवार तूच का असे विचारले़ तेव्हा युवकाने तो ओंकार पवार नाही, असे उत्तर दिले. त्यामुळे तू कोण बोलणार असे म्हणून कॉलेजमधील टोळक्याने युवकाला मारहाण करुन त्याच्या डोक्यात सिमेंटचा ब्लॉक घातला. त्यात या युवकाच्या डोक्याला खोलवर जखम होऊन तो बेशुद्ध पडला. त्याच्या कवटीपर्यंत मार लागून त्यात रक्तस्त्राव झाल्याचे सिटीस्कॅनमध्ये आढळून आले आहे.

नीरज सुनिल नांगरे (वय १७, रा. कात्रज) असे जखमी झालेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे़. विश्रामबाग पोलिसांनी ८ जणांच्या टोळक्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार बाजीराव रोडवरील नु म वि कॉलेजसमोर १९ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेअकरा वाजता घडला. याबाबत सुनिल महादेव नांगरे (वय ५०, रा. खानापूर, ता. भोर) यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा नीरज हा कात्रज येथे राहतो. तो नु म वी मध्ये १२ वी सायन्सला शिकत आहे. १९ ऑक्टोबर रोजी सहामाही परिक्षेचा शेवटचा पेपर सुटल्यानंतर तो मित्रांबरोबर कॉलेजच्या बाहेर आला. शालगर दुकानाजवळून जात असताना ३ मोटारसायकलवरुन ८ ते ९ मुले आली. त्यात कॉमर्स कॉलेजमधील काही मुले होती. हर्षल हा त्यांच्याजवळ येऊन नीरज याचा मित्र प्रणव परभाने याला "ओंकार पवार तुच का" असे विचारले. तेव्हा नीरज याने "ओंकार पवार तो नाही" असे उत्तर दिले. त्यानंतर त्यांच्यातील एकाने तू कोण बोलणार असे बोलून नीरजला हाताने मारण्यास सुरुवात केली. सोबतच्या मुलांनीही लाथा बुक्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याच्यातील एका मुलाने "आज याचा कार्यक्रमच करु" असे म्हणून रस्त्याच्या कडेला पडलेला सिमेंटचा ब्लॉक दोन्ही हाताने उचलून पाठीमागून नीरजच्या डोक्यात जोरात मारला. त्यामुळे नीरजने दोन्ही हाताने डोके पकडून तो खाली पडला. त्याच्या डोक्यातून रक्त वाहू लागल्याचे पाहून हे टोळके पळून गेले. त्यानंतर त्याच्या मित्रांनी त्याला ससून रुग्णालयात नेले. तेथे त्याला रक्ताच्या दोन उलट्या झाल्या व तो बेशुद्ध पडला. डॉक्टरांनी त्याचे सिटीस्कॅन केले. त्यामध्ये डोक्याची कवटी मागच्या बाजुला चेंबली असल्याचे आढळून आले. डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रिया केली. तरीही तो बराच काळ बेशुद्ध होता. नुकताच तो थोडा शुद्धीवर आल्यानंतर त्याच्या वडिलांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक निकुंभ तपास करीत आहेत.

Web Title: A group of college boys beat up the youth until he fell unconscious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.