पुण्यात हृदयाचा थरकाप उडवणारी घटना! नातवानेच मालमत्तेसाठी आजीचा खून करून केले तुकडे
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2022 09:37 AM2022-09-07T09:37:05+5:302022-09-07T09:37:52+5:30
धक्कादायक म्हणजे या नराधमाने लाकडे कापण्याच्या इलेक्ट्रिक कटरने तिच्या शरीराचे तुकडे करून नदीत फेकून दिल्याचे समाेर आले
पुणे : मालमत्तेसाठी नातवानेच आजीचा खून केल्याचा प्रकार पुण्यात मुंढवा भागात घडला. धक्कादायक म्हणजे या नराधमाने लाकडे कापण्याच्या इलेक्ट्रिक कटरने तिच्या शरीराचे तुकडे करून नदीत फेकून दिल्याचे समाेर आले आहे. उषा विठ्ठल गायकवाड (वय ६२, रा. म्हसोबानगर, केशवनगर, मुंढवा) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी साहील उर्फ गुड्डू संदीप गायकवाड (वय २०), संदीप विठ्ठल गायकवाड (वय ४२, दाेघेही रा. म्हसोबानगर, केशवनगर, मुंढवा) या दोघा बाप-लेकाला अटक केली आहे. संदीप हा एका राजकीय पक्षाचा पदाधिकारी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
उषा गायकवाड यांच्या मुलीने दिलेली तक्रार आणि लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका महिलेचा मिळून आलेला पाय व अपहरणाच्या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांनी या खुनाचा छडा लावला आहे.
उषा गायकवाड सरकारी खात्यातून निवृत्त झाल्या होत्या. त्यांनी म्हसोबानगर येथे जागा घेऊन घर बांधले आहे. निवृत्त झाल्यापासून त्या मुलगा, नातू व सुनेसोबत एकत्र राहत होत्या. त्यांनी मुलाला काही पैसे हातउसने दिले होते. त्यामुळे मालमत्तेच्या वादातून त्यांच्यात अनेकदा वाद होत होते. त्यावेळी उषा या साहिल व त्याचे वडील संदीप यांना घर सोडून जाण्यास सांगत असत. त्यामुळे साहिल हा नेहमीच आजी उषा यांच्यावर चिडून असायचा. त्यातूनच त्याने ५ ऑगस्ट रोजी उषा या घरात झोपल्या असताना, दुपारी त्यांचा गळा दाबून खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी व पोलिसांना गुंगारा देण्यासाठी उषा वापरत असलेला मोबाईल त्यांच्या काशेवाडी परिसरात ठेवून दिला.
मंगळवार पेठेतून झाडे कापण्याचे इलेक्ट्रिक कटर घेऊन येत उषा यांच्या शरीराचे तुकडे केले. यानंतर ते तुकडे दुचाकी व चारचाकी गाडीतून पोत्यात भरून सुरुवातीला केशवनगर येथील जॅकवेल कचरा डेपोच्या बाजूला मुळा-मुठा नदीपात्रात, तसेच थेऊर येथील नदीच्या पुलावरून वाहत्या पाण्यात टाकून दिले. त्यानंतर घरी येऊन इलेक्ट्रिक कटर व रक्ताने भरलेले कपडे मांजरी येथे नदीपात्रात टाकून दिले.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, उपायुक्त नम्रता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रह्मानंद नाईकवाडी, गुन्हे निरीक्षक प्रदीप काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अविनाश मराठे, संतोष जगताप, वैभव मोरे, राजू कदम, महेश पाठक, योगेश गायकवाड, नीलेश पालवे, दिनेश भांदुर्गे यांनी केली.
असा लागला छडा
- उषा गायकवाड यांची मुलगी शीतल कांबळे (वय ४०) हिने मुंढवा पोलीस ठाण्यात आईच्या अपहरणाची तक्रार देऊन तिच्या जीवाचे बरेवाईट झाल्याची शंका व्यक्त केली होती. त्यानुसार पोलिसांनी नातू साहिल व मुलगा संदीप यांना ताब्यात घेतले. तसेच साहिलची सख्खी व सावत्र आई अशा दोघींकडे चौकशी केली. त्यावेळी पोलिसांना सर्वांच्या बोलण्यात विसंगती आढळून आली.
- पोलिसांनी प्रत्येक एका व्यक्तीकडे केलेल्या चौकशीत साहिल याच्या दोन्ही आईंनी पोलिसांना खरे वास्तव कथन केले. त्यानुसार पोलिसांनी साहिल व संदीप या दोघांना पोलिसी खाक्या दाखवला. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
- वाडेगाव येथे मिळालेला पाय आणि डीएनएचा अहवाल सकारात्मक मिळाल्याने तो पाय उषा यांचाच असल्याचे निष्पन्न झाले.