Shaniwar Wada: देशातील वक्त्यांच्या भाषणांनी दणाणून जाणारी ऐतिहासिक वास्तू; असा हा निवडणुकीतील शनिवारवाडा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2024 02:56 PM2024-11-10T14:56:18+5:302024-11-10T14:58:06+5:30
काँग्रेस, जनसंघ, हिंदू महासभा, कम्युनिस्ट, संयुक्त समाजवादी, प्रजा समाजवादी अशा अनेक पक्षांचे नेते शनिवारवाड्यावर सभांसाठी येत होते
राजू इनामदार
पुणे: एकेकाळी दिल्लीला धाक दाखवणारा शनिवारवाडा पुण्यात आहे ही पुणेकरांसाठी स्वाभिमान, अस्मिता वगैरेची गोष्ट आहेच; पण त्याहीपेक्षा ती जिव्हाळ्याची, आपुलकीची, प्रेमाची गोष्ट आहे. याचे कारण शनिवारवाड्याबरोबरच समोरचे विस्तीर्ण पटांगण. मागे वाड्याचा भव्य असा दिल्ली दरवाजा. त्याकडे पाठ करून वक्ता उभा आणि त्याच्यासमोरच्या पटांगणात बसलेले पुणेकर श्रोते. त्यांची दाद मिळावी म्हणून वक्ता अगदी आतुरतेने वाट पाहत असे. साहित्यिक, सांस्कृतिक असे सर्व प्रकारचे वाद या जागेत खेळले गेलेच; पण खरी बहार येत असे ती निवडणुकांच्या प्रचारसभांमध्ये. देशातील, राज्यातील वक्त्यांच्या भाषणांनी मैदान दणाणून जात असे.
शब्दांची दिवाळी
पेशवाईत घोड्यांच्या टापा घुमलेल्या याच पटांगणात निवडणुकांच्या प्रचारसभांमध्ये अगदी काल-परवापर्यंत शब्दांच्या तोफा उडत असत. उखळी बार होत तेही शब्दांचेच. आतषबाजी होई तीही शब्दांचीच. शब्दच बंदुकीच्या गोळ्या होऊन समोर येत. ते राज्यात, देशात गाजत. या पटांगणात बोलण्याची संधी मिळावी, ही देशातील प्रत्येक वक्त्याची मनोमन इच्छा असे. निवडणुकीत ही संधी सहज मिळायची. प्रमुख वक्ता येण्याच्या आधी काहीजणांवर फड गाजवायची जबाबदारी असायची. त्यांच्या दृष्टीने ती दिवाळीच असे. पुण्यातील वक्ते व श्रोते यांची जुगलबंदी तर या मैदानात नित्यनियमाने होत असे.
पु.लं.चे प्रत्युत्तर
आणीबाणीनंतरची पु. ल. देशपांडे यांची एक सभा अशीच गाजली. त्या सभेच्या आधी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण देशपांडे यांना उद्देशून म्हणाले होते, ‘यांना ॲग्रीकल्चरमधले काय कळते?’ त्याला शनिवारवाड्यावरील सभेमध्ये उत्तर देताना पुलं म्हणाले, “आम्हाला ॲग्रीकल्चरमधले नसेल कळत; पण कल्चरमधील नक्कीच कळते.” पुलं यांचा हा टोला चव्हाण यांच्या चांगलाच वर्मी लागला होता. आणीबाणीनंतर जनता पक्षाची विजय सभा शनिवारवाड्यावरच झाली होती. त्या सभेत पुलं बोलणार होते, ‘मात्र राजकारण हा माझा प्रांत नाही’ असे स्पष्ट करत पुलंनी त्यांच्या भाषणाची व यानंतर राजकीय भाषणे नाही असा निर्धार व्यक्त करणारी ध्वनिफित पाठवली होती. तीच या सभेत श्रोत्यांना ऐकवण्यात आली.
असे होते वक्ते आणि राजकीय पक्ष
यशवंतराव चव्हाण, आचार्य अत्रे, श्रीपाद अमृत डांगे, काकासाहेब गाडगीळ, केशवराव जेधे, स्वातंत्र्यवीर सावरकर अशा अनेकांच्या वक्तृत्वाने हे मैदान गाजले. देशभरातून अनेक लोक येत. त्यांच्यासाठी शनिवारवाड्यावरची सभा म्हणजे कसोटीच असायची. पुणेकर श्रोते महामिश्किल. एखाद्याचे बोलणे नाही आवडले तर मधूनच टाळ्या वाजवत. एखाद्याचे आवडले तर भले शाब्बास म्हणून एखादी तरी आरोळी श्रोत्यांमधून यायचीच. काँग्रेस, जनसंघ, हिंदू महासभा, कम्युनिस्ट, संयुक्त समाजवादी, प्रजा समाजवादी अशा अनेक पक्षांचे नेते सभांसाठी येत, त्यांच्या भाषणांसाठी गर्दी व्हायची.
एक हृद्यद्रावक घटना
संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना पुण्यात झाली. केशवराव जेधे समितीचे अध्यक्ष होते. त्यांच्याच अध्यक्षतेखाली आचार्य अत्रे यांची एक सभा शनिवारवाड्यावर झाली. अत्रे भाषण करत होते, त्याच वेळी मागे अध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसलेल्या जेधे यांना हृदयविकाराचा धक्का बसला. खुर्चीवरून ते कोसळले. त्यातच त्यांचे निधन झाले. शनिवारवाड्याच्या पटांगणातील ही एक हृद्यद्रावक घटना. जेधे त्यावेळी मोठे नेते होते. काँग्रेसमध्ये होते. त्यांच्या निधनाने राज्यात हळहळ व्यक्त झाली.
सभेची तयारी
पूर्वी सभांची तयारी म्हणजे दिल्ली दरवाजासमोर एक लहानसे व्यासपीठ तयार व्हायचे. चारही बाजूंना चार खांब, त्याला रंगीत कापड गुंडाळलेले, वर असले तर छत नाही तर तेही नाही. आतासारखी भव्यदिव्य व्यासपीठे नसायची. सगळीकडे कर्णे लावलेले. स्टेजवर मोजक्याच दोन-तीन खुर्च्या. एकीत अध्यक्ष, दुसरीत वक्ता व तिसऱ्या खुर्चीवर असलाच तर उमेदवार. समोर श्रोते पोती, सतरंजी वगैरेंवर बसलेले. कोणी फारच ज्येष्ठ व वृद्ध पुढारी वगैरे असतील तर त्यांच्यासाठी काही खुर्च्या असायच्या. त्या बळकावण्याचे धाडस कोणीही करत नसे. इतक्या कमी भांडवलावर सभा सुरू व्हायची. सभेची वेळ असायची रात्री ९ नंतर वगैरे. कारण त्यावेळी वेळेची मर्यादा नव्हतीच. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत सभा चालायची.
वक्त्यांची वैशिष्ट्ये
अत्रेंसारखे नावाजलेले वक्ते असले तर पुण्यातील भेटीगाठींमध्येच त्यांचा बराचसा वेळ जायचा. त्या झाल्यानंतर रात्री उशिरा ते सभास्थानी येत. त्यांचे भाषण म्हणजे हशा व टाळ्यांची बरसातच. स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे प्रखर हिंदुत्व. इतिहासाचे दाखले देत शब्दांच्या अशा काही लडी ते उलगडत की, श्रोते भारावून जायचे. त्याउलट यशवंतराव चव्हाण, एस. एम. जोशी ही नेतेमंडळी. अतिशय शांत; पण ठाशीव स्वरात ते त्यांचे म्हणणे समजावून देत असत. वर्ष २०१७ पासून शनिवारवाड्याचे पटांगण जाहीर सभांसाठी देणे महापालिकेने बंद केले. त्याची एक वेगळीच कथा आहे; मात्र आता है मैदान सभेसाठी दिले जात नाही. त्यामुळे राजकीय पक्षांना दुसऱ्या मैदानांचा शोध घेणे भाग पडले. आता हे पटांगण शांत असते. झालेच तर तिथे काही सांस्कृतिक कार्यक्रम होतात; पण तेही आता कमी झाले आहे. बाजीरावांचा दिल्लीकडे भाला रोखलेला पुतळा त्यामुळे एकटाच दिसतो.