ऑपरेशनच्या वेळी गरम पाण्याची पिशवी लिक झाल्याने रुग्ण भाजला; पुण्यातील धक्कादायक प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2023 10:08 AM2023-01-11T10:08:54+5:302023-01-11T10:09:06+5:30
इनलॅक्स अँड बुधरानी हॉस्पिटलमधील डॉक्टरांसह स्टाफवर गुन्हा दाखल
पुणे : अपघातामध्ये डोक्याला जखम झाल्याने ज्येष्ठ नागरिकाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे डोक्यावर शस्त्रक्रिया करताना रुग्णाच्या पोटावर व गुप्तांगावर भाजल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी इनलॅक्स अँड बुधरानी हॉस्पिटलमधीलडॉक्टरांसह स्टाफवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिरालाल सारवान (वय ७०, रा. दौंड) असे जखमी झालेल्या रुग्णाचे नाव आहे. याप्रकरणी अॅड. सुरेश सारवान यांनी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिरालाल सारवान हे रेल्वे कर्मचारी असून २०१२ मध्ये सेवानिवृत्त झाले आहे. हे नेहमीप्रमाणे व्यायाम करण्यासाठी सायंकाळी जातात. व्यायाम करून घरी येत असताना ४ जानेवारी रोजी रात्री त्यांना एका दुचाकीस्वाराने धडक दिली. त्यात पडल्याने डोक्याला लागून जखमी झाले. त्यांना प्रथम दौंड रेल्वे हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेथे सिटी स्कॅन केल्यावर डोक्यात रक्तस्त्राव झाल्याचे निदान झाले. त्यांना ५ जानेवारीला मध्यरात्री इनलॅक्स अँड बुधरानी हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. तेथे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर डॉक्टरांनी ऑपरेशन चांगले झाले. पण, आता आयसीयूमध्ये तुम्ही भेटू शकत नाही, असे सांगितले. दुसऱ्या दिवशी फिर्यादी, आई समवेत वडिलांना भेटायला गेले. तेव्हा ते बेशुद्धावस्थेत होते. त्यांच्या पोटावर, हातावर, गुप्तांगावर भाजल्याचा खुणा दिसून आल्या. याबाबत त्यांनी डॉ. महेशकुमार यांना विचारले असताना त्यांच्या वडिलांचे शरीर थंड पडल्याने त्यांना गरम करण्यासाठी लावलेली गरम पाण्याची पिशवी लिकेज झाल्याने त्यांच्या पोटाला, हातास व गुप्तांगाला भाजले असून, आता सध्या नॉर्मल असल्याचे त्यांनी सांगितले.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी ही जखमी आणखीच चिघळल्याचे दिसून आले. ही बाब समजल्यावर पुण्यातील वकिलांनी हॉस्पिटलमध्ये धाव घेतली. त्यानंतर कोरेगाव पार्क येथे जाऊन पोलिस अधिकाऱ्यांना सर्व घटना सांगितली. त्यानंतर पोलिसांनी हॉस्पिटलमधील डॉक्टर व स्टाफविरोधात गुन्हा दाखल केला आहे.