मानवाधिकार संघटनेची धमकी देत मजुराची तब्बल २ लाखांची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2023 01:04 PM2023-04-02T13:04:04+5:302023-04-02T13:04:20+5:30
मोलमजुरीवर उपजीविका करणाऱ्याने दोन गुंठे प्लॉट घेण्यासाठी दोन लाख दिले होते
बारामती :मानवाधिकार संघटनेची धमकी देत बारामती येथे एकाने मजुराला २ लाख ६५ हजाराचा गंडा घातला आहे. याबाबत शहर पोलिस ठाण्यात अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अमीन हंबीर शेख (रा. स्नेह कुंज अपार्टमेंट भिगवन रोड) हा ऑल इंडिया मानवाधिकार संघटनेशी सबंधित आहे. त्याच्या विरोधात नवनाथ सोमनाथ माने यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. नवनाथ माने हा मोलमजुरी करून आपली उपजीविका करतो. बारामती शहरांमध्ये आपल्याला स्वत:ला राहण्यासाठी जागा असावी म्हणून त्याने ऑल इंडिया मानवाधिकार संघटनेचा अमीन हंबीर शेख याला धनादेशाद्वारे ऑनलाईन व रोख स्वरूपात २ लाख ६५ हजार रुपये दोन गुंठे प्लॉट घेण्यासाठी दिले. त्यांनी प्लॉटही दाखवला परंतु प्रत्यक्षात तो प्लॉट शेख याने नवनाथ माने यांना दिला नाही. त्यानंतर वेळोवेळी त्यांनी प्लॉट देण्याबाबत त्यांच्याकडे विचारणा केली असता, माने यांना संघटनेची भीती घालण्यात आली. पोलिसांनी देखील शेख याला दोन वेळा नवनाथ माने या गरीबाचे पैसे देऊन टाका, अशी समज दिली. परंतु दोन-तीन महिने होऊन सुद्धा शेक याने टोलवाटीवी केली. नंतर फिर्यादी नवनाथ माने यांनी शेख याला समक्ष भेटून पैसे देण्याबाबत विनंती केली. मात्र शेख याने माने यांना जातीवाचक शिवीगाळ करून पुन्हा संघटनेची धमकी दिली. यानंतर पोलिसांनी शेख याच्या विरोधात अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला.