Pune: कांदळी येथे बिबट्याचा दुचाकीस्वारावर हल्ला, जखमीवर उपचार सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2024 05:26 PM2024-03-04T17:26:01+5:302024-03-04T17:26:24+5:30
समोर बिबट्याने हल्ला केल्याचे दिसल्यानंतर त्यांनी आरडाओरडा केल्याने बिबट्याने या ठिकाणाहून पळ काढला...
वडगाव कांदळी (पुणे) : कांदळी (ता. जुन्नर) येथील मंगेश रामदास गुंजाळ (वय २६) हा युवक रविवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास सुतारठिके वस्तीवर असलेल्या दूध डेअरीमध्ये दूध घालण्यासाठी मोटारसायकलवरून जात असताना बिबट्याने या युवकावर अचानकपणे हल्ला केल्याने तो मोटारसायकलवरून घाबरून खाली पडला. याचवेळी संतोष गुंजाळ, अक्षय महाले हे पाठीमागून दुचाकीवर येत होते. समोर बिबट्याने हल्ला केल्याचे दिसल्यानंतर त्यांनी आरडाओरडा केल्याने बिबट्याने या ठिकाणाहून पळ काढला. परंतु यामध्ये मंगेश हा खाली पडल्याने गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर आळेफाटा येथील एका खासगी दवाखान्यात उपचार चालू आहे.
कांदळी परिसरात बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. सध्या ऊसतोडणी अंतिम टप्प्यात आली असून, या ठिकाणी असलेल्या बिबट्यांना लपण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने तसेच त्यांना त्यांचे खाद्य उपलब्ध नसल्याने ते मानवी वस्तीमध्ये येऊन पाळीव प्राण्यांवर, माणसांवर हल्ले करू लागले आहेत. वन विभागाने परिसरात तत्काळ पिंजरे लावावेत, तसेच बिबट्याने केलेल्या हल्ल्याने मंगेश हा दुचाकीवरून खाली पडून गंभीर जखमी झाला असून, त्यास वन विभागाने उपचारासाठी भरपाई द्यावी, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.