Pune: शिंदेवाडीत बिबट्याचा बछडा अडकला पिंजऱ्यात, ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2023 11:22 AM2023-11-21T11:22:16+5:302023-11-21T11:26:20+5:30
शिंदेवाडी शिवारात काही दिवसांपासून एक बिबट मादी व दोन बछडे फिरताना दिसून आल्याने ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे...
बेल्हा (पुणे) : शिंदेवाडी (ता. जुन्नर) येथील गावच्या हद्दीत बिबट्यासाठी लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात बिबट्याचा बछडा अडकला आहे. शिंदेवाडी शिवारात काही दिवसांपासून एक बिबट मादी व दोन बछडे फिरताना दिसून आल्याने ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ग्रामस्थांच्या मागणीवरून वनविभागाकडून शिंदेवाडी येथील पाउत्के माथ्यावर पांडुरंग दगडू शिंदे यांच्या शेतात तीन दिवसांपूर्वी पिंजरा लावण्यात आला होता. त्या पिंजऱ्यात शनिवारी रात्रीच्या सुमारास दोन ते तीन महिने वयाचा बछडा दिसून आला. या परिसरात अजूनही दोन बिबटे असल्याचे लोकांनी सांगितले.
स्थानिक ग्रामस्थांकडून वनविभागाला कळविण्यात आल्यानंतर वनकर्मचारी जे.टी. भंडलकर तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तेथील परिस्थितीची पाहणी करून वरिष्ठांना माहिती दिल्यानंतर ओतूर येथील वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली वनकर्मचारी जे.टी. भंडलकर व आनंद गुंजाळ यांनी बछड्याला माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्रात हलविण्यात आल्याचे सांगितले.