खडकवासला परिसरात फिरतोय बिबट्या! नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2022 08:10 AM2022-09-08T08:10:06+5:302022-09-08T19:25:01+5:30
वन विभागाचा दुजोरा...
पुणे :खडकवासला येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्मामेंट टेक्नॉलॉजीच्या क्वार्टर्समध्ये मंगळवारी रात्री बिबट्या आला होता. त्या बिबट्यामुळे तिथली कुत्री जोरजोरात भुंकत असल्याने एका नागरिकाने त्याचा व्हिडिओ काढला. याला वन विभागाने देखील दुजोरा दिला असून, त्यांची टीम घटनास्थळी जाऊन आली आहे. खडकवासला परिसरातील नागरिकांनी रात्री घराबाहेर विनाकारण फिरू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
खडकवासला परिसरात घनदाट झाडी आहे. त्यामुळे तिकडे बिबट्याचा वावर दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी पानशेत परिसरातील एका ठिकाणी बिबट्याने नागरिकावर हल्ला केला होता. त्यानंतर आता पुन्हा खडकवासला परिसरात बिबट्या दिसला आहे. मंगळवारी रात्री इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्मामेंट टेक्नॉलॉजीच्या क्वार्टर्समध्ये बिबट्या घुसला होता. तो एका झाडावर चढलेला. तेव्हा तेथील दोन-तीन कुत्री त्यावर भुंकत होती. त्यामुळे तो झाडावरून खाली आला आणि भुंकणाऱ्या कुत्र्यांना पकडण्याचा प्रयत्न करू लागला. पण कुत्री पळून गेली. त्यानंतर पुन्हा तो कुत्रे भुंकू लागल्याने तेथून पळून गेला. ही घटना एका नागरिकाने गॅलरीतून मोबाईलमध्ये शूट केली आहे.
दरम्यान, याविषयी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तेथे भेट दिली आणि माहिती जाणून घेतली. तेथील नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच रात्री विनाकारण घराबाहेर पडू नये, अशा सूचना केल्या आहेत.
बचाव कसा करायचा ?
- रात्री घराबाहेर पडताना बिबट्या दिसला तर मोठ्याने आवाज करावा. बिबट्या आवाजाला घाबरून पळून जातो.
- पायी फिरत असाल तर मोबाईलवर गाणी लावावी, जेणेकरून आजूबाजूला बिबट्या असेल तर दूर जातो.
- खडकवासला परिसरात सकाळी अनेकजण फिरायला जातात, तेव्हा सोबत एखादी काठी ठेवावी, ज्याने स्वतःचा बचाव करता येईल.
- रात्री दुचाकीवर जाताना मध्ये मध्ये हाॅर्न वाजवावा.
खडकवासला परिसरात बिबट्या आल्याची माहिती समजली असून, आमची टीम तिथे जाऊन पाहणी करून आली. योग्य त्या सूचना दिल्या आहेत. लोकांनी सावध राहावे.
- प्रदीप संकपाळ, वनपरिक्षेत्र अधिकारी, पुणे