जन्मठेपेच्या कैद्याने येरवडा कारागृह प्रशासनालाच घातला २७ लाखांचा गंडा
By भाग्यश्री गिलडा | Published: September 23, 2023 06:26 PM2023-09-23T18:26:44+5:302023-09-23T18:27:12+5:30
याप्रकरणी सचिन रघुनाथ फुलसुंदर (रा. येरवडा कारागृह, मूळचा मोकास बाग, जुन्नर) याच्याविरोधात येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे....
पुणे : जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैद्याने मनीऑर्डर रजिस्टरमध्ये खोट्या नोंदी करून कारागृहाची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सचिन रघुनाथ फुलसुंदर (रा. येरवडा कारागृह, मूळचा मोकास बाग, जुन्नर) याच्याविरोधात येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार २०२१ ते ऑगस्ट २०२३ दरम्यान घडला आहे. नारायणगाव येथील खुनाचा प्रयत्न आणि बलात्कार या गुन्ह्यात सत्र न्यायालयाने सचिन फुलसुंदर याला २१ मे २००९ रोजी जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. तो मे २००५ पासून येरवडा कारागृहात आहे. कारागृह प्रशासनाने त्याला साफसफाईचे काम दिले होते. कारखाना विभागात तयार होणाऱ्या वस्तू बाहेर पाठविण्याच्या बहाण्याने तो न्याय विभागात जायचा. तेथे कैद्यांना त्यांचे नातेवाइकांनी केलेल्या मनिऑर्डरचे रजिस्टर असते. कैद्यांना त्यांचे नातेवाईक कारागृहात दैंनदिन गरजा भागविण्यासाठी पैसे पाठवत असतात. त्याची नोंद या रजिस्टरमध्ये केलेली असते. त्यातील नोंदीनुसार कैंद्यांना कॅन्टीनमधून आवश्यक त्या वस्तू घेता येतात.
सचिन फुलसुंदर याने तेथील रजिस्टरमध्ये फेरफार करून खोटी दिनांक, खोटी स्वाक्षरी व खोटे हिशेब तयार केले. त्यात कारागृहातील इतर कैद्यांच्या नावावर मोघम रकमा टाकून मनीऑर्डर आल्याची नोंद केली. स्वत:च्या नावावरही रकमा टाकल्या. ही रक्कम त्यांनी कॅन्टीनमध्ये वापरुन शासनाची २६ लाख ६९ हजार ९११ रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार तब्बल दोन वर्षांनी उघडकीस आल्यावर तुरुंगाधिकारी बापुराव भीमराव मोटे यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिस उपनिरीक्षक काटे पुढील तपास करीत आहेत.