Yerwada Jail: येरवडा खुल्या कारागृहातून जन्मठेपेचा कैदी पळाला
By नम्रता फडणीस | Updated: July 15, 2024 16:32 IST2024-07-15T16:31:31+5:302024-07-15T16:32:26+5:30
कैद्याची वर्तवणूक चांगली असल्याने त्याची रवानगी कारागृह प्रशासनाने खुल्या कारागृहात केली होती

Yerwada Jail: येरवडा खुल्या कारागृहातून जन्मठेपेचा कैदी पळाला
पुणे : देवीपाडा गावात एकाचा खून केल्या प्रकरणात येरवड्यातील खुल्या कारागृहात तो जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. सायंकाळी कैद्यांची हजेरी घेताना तो उपस्थित नसल्याचे आढळल्याने त्याची शोधाशोध सुरु केली. तेव्हा हा कैदी पळाल्याचे उघडकीस आले .
आत्माराम उर्फ आत्म्या लाडक्या भवर असे पळून गेलेल्या कैद्याचे नाव आहे. भवर हा मूळचा पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात असलेल्या देवीपाडा गावचा रहिवासी. २००९ मध्ये त्यााने देवीपाडा गावात एकाचा खून केला होता. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात न्यायालयाने त्याला जन्मठेप आणि २ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. दंड न भरल्यास सहा महिने कारवास भोगावा लागेल, अशी तरतूद न्यायालयाने आदेशात केली होती. तेव्हापासून भवर येरवडा कारागृहात होता. दरम्यान, भवरची वर्तवणूक चांगली असल्याने त्याची रवानगी कारागृह प्रशासनाने खुल्या कारागृहात केली होती. खुल्या कारागृहातील कैदी शेती करतात. शनिवारी दिवसभर भवर खुल्या कारागृहात होता. कारागृहात रक्षक तौसिफ सय्यद यांनी सायंकाळी पाचच्या सुमारास कैद्यांची हजेरी घेण्यात आली. तेव्हा भवर उपस्थित नसल्याचे आढळून आले. कारागृहातील रक्षकांनी त्याचा शोध घेतला. मात्र, तो सापडला नाही. त्यानंतर याबाबत येरवडा कारागृहातील अधिकारी हेमंत पाटील यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पसार झालेल्या भवरचा शोध घेण्यात येत असून, पोलीस अंमलदार जाधव तपास करत आहेत.