फोटो डिलिट करायला लिंक दिली, क्लिक करताच १२ लाख हडपले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2023 10:25 AM2023-11-29T10:25:15+5:302023-11-29T10:26:46+5:30
ही घटना १२ जुलै ते गुन्हा दाखल होईपर्यंतच्या काळात घडली आहे...
पुणे : जुन्या फर्निचर विक्रीसाठी ओएलएक्सवर टाकलेले फोटो डिलिट करायला सांगून एक लिंक पाठवत सायबर चोरट्याने एकाची ११ लाख ७२ हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी आदि इचिपोरीया (वय ५२, मोहम्मदवाडी) यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात मोबाइलधारकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना १२ जुलै ते गुन्हा दाखल होईपर्यंतच्या काळात घडली आहे.
अधिक माहितीनुसार, फिर्यादी आदि इचिपोरीया यांनी घरातील जुने फर्निचर विक्रीसाठी त्याचे फोटो ओएलएक्सवर टाकले होते. सायबर चोरट्याने फिर्यादी यांना फोन करून फर्निचर घ्यायचे आहे, असे बोलून ओएलएक्सवरील पोस्ट डिलिट करण्याकरिता एक लिंक पाठवली. ती लिंक डाउनलोड करण्यास सांगून फिर्यादी यांच्या मोबाइलचा ॲक्सेस घेत बँक खात्यावर पाच लाखांचे कर्ज मंजूर करून चोरट्यांनी ते पैसे विविध बँक खात्यावर वळवत फिर्यादींची ११ लाख ७२ हजारांची फसवणूक केली आहे. याप्रकरणाचा पुढील तपास कोंढवा पोलिस करीत आहेत.