पावसाची शहरात जराशी विश्रांती! पुणेकरांना दिवसभर लख्ख उन्हाचा अनुभव
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2023 09:44 AM2023-07-04T09:44:37+5:302023-07-04T09:45:21+5:30
येत्या दोन दिवसांत ढगाळ वातावरण राहणार असून, हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे...
पुणे : पावसाने शहरात व जिल्ह्यातही सोमवारी विश्रांती घेतली. गेल्या तीन-चार दिवसांपासून पावसाची संततधार सुरू होती. ती आता थांबली आहे. पुणेकरांनी दिवसभर लख्ख उन्हाचा अनुभव घेतला. उष्णता खूप असल्याने घामाच्या धाराही अनुभवल्या. त्यानंतर सायंकाळी पुन्हा ढगाळ वातावरण तयार झाले होते. येत्या दोन दिवसांत ढगाळ वातावरण राहणार असून, हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.
येत्या ९ जुलैपर्यंत पुणे शहरात दिवसा आकाश पूर्णत : ढगाळ राहणार असून, सायंकाळी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच घाट पायथ्यावर तुरळक ठिकाणी मुसळधार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. शहरात सोमवारी २ मिमी पावसाची नोंद झाली. शिवाजीनगर परिसरात तर लख्ख उन्ह पडले होते आणि आकाश बराच काळ निरभ्र होते. हडपसर, वडगावशेरी, कोरेगाव पार्क परिसरात मात्र दुपारी पावसाने हजेरी लावली.
शहरातील पाऊस
वडगाव शेरी : २.५ मिमी
हडपसर : २.५ मिमी
कोरेगाव पार्क : १.५ मिमी
हवेली : १.५ मिमी
पाषाण : १.३ मिमी
शिवाजीनगर : ०.३ मिमी
घाट माथ्यावर पाऊस
लोणावळा : ५८ मिमी
शिरगाव : ६५ मिमी
भिवपुरी : ५८ मिमी
कोयना : १३० मिमी
ताम्हिणी : ५६ मिमी.