आषाढी वारी | पुणे जिल्ह्यातील वातूंडे गावच्या भातशेतात साकारली विठ्ठलाची भव्य मूर्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2022 12:04 PM2022-07-09T12:04:16+5:302022-07-09T12:11:40+5:30
दर्शन घेण्यासाठी विविध गावातील भाविक वातुंडेत येत आहेत...
पौड (पुणे) : मुठा खोऱ्यातील वातुंडे गावचे रहिवासी ह.भ.प. बाळकृष्ण महाराज शिंदे आणि त्यांच्या पत्नी प्राथमिक शाळा शिक्षिका लक्ष्मी शिंदे या दाम्पत्याने आपली विठ्ठलाप्रति असलेली भक्ती अनोख्या पद्धतीने व्यक्त केली आहे. आपल्या शेतात १२० x ६० फूट एवढी भव्य अशी भात रोपातून पांडुरंगाची सजीव मुर्ती तयार करून त्याचे दर्शन संपूर्ण महाराष्ट्राला घडविले आहे.
पंढरीची वारी करता आली नाही ही खंत न वाटू देता शिंदे दाम्पत्यांनी साक्षात देवालाच आपल्या शेतात उभे केले असल्याची भावना येथील ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत. त्यांच्या या भक्तिमय कलेची दखल विविध माध्यमांनी घेतली असून या भात रोपांनी सगुण साकार रुपात प्रकटलेल्या पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी विविध गावातील भाविक वातुंडे येथे येत आहेत.
यावेळी बोलताना बाळकृष्ण शिंदे म्हणाले की, देवाला फक्त भक्तीने जवळ करता येते बाकी सगळ खोटं आहे. म्हणून तर सावता माळी त्याला भाजीत पाहतात, जनाबाई त्याला शेणाच्या गोवऱ्यांमध्ये, मीराबाई विषाच्या पेल्यात, कबीर महाराज शेल्यामध्ये. इश्वर आपल्या कायम जवळ आहे फक्त आपण तो पाहिला पाहिजे याच भावनेने आम्ही ही जिवंत मूर्ती आपल्या शेतात तयार करण्याचा संकल्प केला. त्याला ग्रामस्थ व निसर्गाने मोलाची साथ दिल्याने आम्हाला साक्षात भगवंताने दर्शन दिल्याने खूप आनंद होत आहे.