विद्यार्थीनींकडे बघून एकाचे हस्तमैथुन; सावित्रीबाई फुले विद्यापीठातील धक्कादायक प्रकार, विद्यार्थ्यांचे आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 19:14 IST2025-03-27T19:12:22+5:302025-03-27T19:14:58+5:30
रात्री उशीरा ९ वाजेपर्यंत मुली तिकडे काय करत होत्या? कुलुगुरूंचा तक्रार करणाऱ्या विद्यार्थिनींना उलटप्रश्न

विद्यार्थीनींकडे बघून एकाचे हस्तमैथुन; सावित्रीबाई फुले विद्यापीठातील धक्कादायक प्रकार, विद्यार्थ्यांचे आंदोलन
पुणे : भररस्त्यात लघुशंका करणाऱ्या आहुजाच्या प्रकरणानंतर आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विद्यापीठाच्या आवारात तीन विद्यार्थीनींकडे बघून एकाने हस्तमैथुन केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घडलेल्या प्रकाराबाबत विद्यापीठ प्रशासनाकडून कोणतीही कारवाई न झाल्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनासमोर विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत विद्यापीठ प्रशासन याबद्दल कोणतेही पाऊल उचलत नाही. तोपर्यंत आंदोलन करण्याचे विद्यार्थ्यांनी ठरवले असून ते सर्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनासमोर आंदोलन करत बसले आहेत.
विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहीतीनुसार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनाच्या समोर जेवण करून तीन विद्यार्थीनी रिफेक्टरीकडून मुलींच्या हॉस्टेलकडे जात होत्या. त्यावेळी मराठी भाषा विभागाबाहेर एका व्यक्तीने त्यांच्याकडे बघून हस्तमैथुन केले. दोघींनी त्या व्यक्तीला जाब विचारण्यास सुरुवात केली तर एकीने तातडीने आंबेडकर भवनजवळील सुरक्षारक्षकाकडे धाव घेतली. परंतु नंतर तो व्यक्ती पळून गेल्याचे त्यांनी सांगितले.
कुलगुरूंचा विद्यार्थिनींना उलट प्रश्न
प्रभारी कुलसचिव डॉ. ज्योती भाकरे यांच्याकडे झालेल्या प्रकाराबाबत विद्यार्थिनींनी तक्रार केली. मात्र त्यांनी हा विषय माझ्या अखत्यारीत येत नसल्याचे उत्तर दिले. तसेच यासंदर्भात तुम्ही कुलगुरूंना भेटा असे सांगितले असल्याचे विद्यार्थ्यांनी माहिती दिली. विद्यार्थिनींनी कुलगुरूंची भेट घेतली. त्यांना झालेल्या प्रकारची माहिती दिली. मात्र रात्री उशीरा ९ वाजेपर्यंत मुली तिकडे काय करत होत्या. असा उलटप्रश्न कुलगुरूंनी विद्यार्थिनींना केला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरु ठेवले आहे. या प्रकाराची विद्यापीठ प्रशासन दखल घेणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.