Video: पुण्यातील लुल्लानगरमध्ये सातव्या मजल्यावरील हॉटेलला भीषण आग
By विवेक भुसे | Published: November 1, 2022 10:27 AM2022-11-01T10:27:39+5:302022-11-01T10:29:12+5:30
बेकायदेशीर रुफ टॉप हॉटेलचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
पुणे : कोंढव्यातील लुल्लानगर चौक येथील मार्वल विस्टा इमारतीतील सातव्या मजल्यावरील हॉटेलला मंगळवारी सकाळी भीषण आग लागली. ही आग इतकी मोठी होती की काही मिनिटातच संपूर्ण हॉटेल या आगीत जळून खाक झाले.
लुल्लानगर चौकात मार्वल विस्टा या इमारतीच्या सातव्या मजल्यावर व्हेजिटा हे रुफ टॉप हॉटेल आहे. आज सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास आग लागली. अग्निशमन दलाला आगीच्या घटनेची माहिती सकाळी ८ वाजून १४ मिनिटांनी मिळाली. त्याबरोबर अग्निशमन दलाची ३ वाहने, २ टॅकर घटनास्थळी पोहचले. तोपर्यंत आगीने मोठे रौद स्वरुप धारण केले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझविण्याचे काम सुरु केले. जवळपास पाऊण तासाच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले. या आगीत कोणीही जखमी झाले नाही. आग विझविल्यानंतर आता कुलिंगचे काम सुरु आहे. आग कशी लागली, हे अद्याप स्पष्ट झाले नाही.
पुण्यात लुल्लानगरमध्ये सातव्या मजल्यावरील हॉटेलला भीषण आग #Pune#firepic.twitter.com/DbK3jtw11k
— Lokmat (@lokmat) November 1, 2022
शहरातील मोठ्या उंच इमारतीच्या टेरेसवर अनेक ठिकाणी बेकायदेशीरपणे रुफ टॉप हॉटेल सुरु आहेत. बाणेर, बालेवाडी, सेनापती बापट रोड येथील अशाच रुफ टॉप हॉटेलांना आगीच्या घटना घडल्यानंतर महापालिकेने या हॉटेलची बेकायदेशीर बांधकाम पाडली होती. तरी हे हॉटेल त्यातून कसे वाचले, असा प्रश्न निर्माण झाला आहे.