Free Fire गेममध्ये अवघ्या १२ वर्षांच्या मुलाने उडविले तब्बल १२ लाख

By विवेक भुसे | Published: September 5, 2022 10:03 AM2022-09-05T10:03:25+5:302022-09-05T10:04:13+5:30

पैसे उडविले मुलाने अन् आळ आला मित्रावर!

A mere 12-year-old boy blew away Rs 12 lakh in the Free Fire game | Free Fire गेममध्ये अवघ्या १२ वर्षांच्या मुलाने उडविले तब्बल १२ लाख

Free Fire गेममध्ये अवघ्या १२ वर्षांच्या मुलाने उडविले तब्बल १२ लाख

Next

पुणे : शेजारच्या दुकानात मोबाइल चार्जिंगला लावत असताना, त्यानेच आपल्या मोबाइलचा गैरवापर करून बँक खात्यातून तब्बल १२ लाख रुपये काढून घेतल्याचा आरोप एका व्यावसायिकाने केला. त्यानुसार, पोलिसांनी त्या दुकानदाराला अटक केली. चौकशीत मात्र वेगळेच समाेर आले. त्या दुकानदाराने नाही, तर फिर्यादीच्या १२ वर्षांच्या मुलानेच फ्री फायर गेममध्ये हे सर्व पैसे हरल्याचे आढळून आले.

या प्रकरणी न्यू कोपरे येथील एका व्यावसायिकाने उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पोलिसांनी या व्यावसायिकाच्या शेजारील दुकानदाराला पोलिसांनी अटक केली.

अधिक माहितीनुसार, फिर्यादी यांचा स्क्रॅपचा व्यवसाय आहे. त्यांच्या एका ग्राहकाने त्यांच्या खात्यात ५० हजार रुपये जमा केले होते. ती रक्कम जमा झाली की नाही, हे पाहण्यासाठी ते बँकेत गेले होते. त्यावेळी त्यांच्या बँक खात्यातून १२ लाख ९ हजार ४५३ रुपये काढले गेल्याचे आढळून आले. त्यांनी बँक स्टेटमेंट पाहिले, तर त्यामध्ये त्यांच्या शेजारच्या दुकानदाराच्या नावावर सुमारे साडेतीन लाख रुपये जमा झाल्याचे दिसले, तसेच १० जूनपासून वेळोवेळी अनेकांच्या बँक खात्यात पैसे जमा झाल्याचे आढळून आले.

फिर्यादी यांच्या दुकानात विद्युत पुरवठा नसल्याने ते आपला मोबाइल शेजारच्या नर्सरीच्या दुकानात चार्जिंगला लावत असे. त्या काळात दुकानदाराने मोबाइलचा गैरवापर करून आपल्या खात्यातील पैसे स्वत:च्या व त्यांच्या परिचित व्यक्तींच्या खात्यावर वर्ग केल्याचा संशय फिर्यादीला आला. त्यांनी पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिली. पोलिसांनीही तक्रार अर्ज आणि बँक स्टेटमेंट पाहून शेजारच्या दुकानदाराला अटक केली. त्याच्याकडे चौकशी केली. तेव्हा धक्कादायक सत्य समोर आले.

तपासात आले समाेर

- फिर्यादी यांचा १२ वर्षांचा मुलगाच फिर्यादी यांचे गुगल पे खात्यावरून पैसे ट्रान्सफर करीत असे. त्याला फ्री फायर गेम खेळण्याचा नाद आहे. त्याने आपण गेममध्ये जिंकलो, असे सांगून शेजारच्या दुकानदाराच्या खात्यात साडेतीन लाख रुपये ट्रान्सफर केले होते.
- वरील बाब समजल्यावर पोलिसांनी फिर्यादीच्या मुलाकडे चौकशी केली. तेव्हा त्याने सांगितले की, फ्री फायर गेम मी खेळत असतो. त्या गेममध्ये हरल्याने ते पैसे वडिलांच्या खात्यातून जिंकलेल्यांना पाठविल्याचे सांगितले. तेव्हा खरा प्रकार समोर आला, पण या सर्व प्रकारात व्यावसायिकाने आपला मित्र असलेल्या शेजारच्या दुकानदारावर आरोप केला. त्याला पोलीस कोठडीची हवा खायला लागली.

गेम काय आणि कसे होतात पैसे खर्च?

फ्री फायर गेम छोट्या मुलांसह तरुणांमध्येही खूप लोकप्रिय आहे. या गेममध्ये खेळणाऱ्या मुलांसाठी एक कॅरेक्टर तयार होते. त्याच्याकडे चाकू, बंदूक, गन असी वेगवेगळी शस्त्र असतात आणि दुसऱ्या ऑनलाइन गेम खेळणाऱ्यांना त्याला मारायचे असते व मिशन पूर्ण करायचे असते.

- हा गेम खेळण्याठी व डाऊनलोड करण्यासाठी फ्री असली, तरी अद्ययावत शस्त्र डाऊनलोड करताना, त्याचे पैसे मोजावे लागतात. याशिवाय आपण कोणत्या कॅरेक्टरनुसार दिसायचे आहे, त्यासाठीही पैसे मोजावे लागतात.
- विराट कोहलीसारखा चेहरा खूप पॉप्युलर असून, त्यासाठी पैसे मोजावे लागतात. खेळणाऱ्या मुलाला प्रत्येक मॅच जिंकण्याचा मोह होत असतो, त्यामुळे तो जास्तीतजास्त चांगले कॅरेक्टर आणि शस्त्र खरेदी करतो. त्यातूनच हजारो रुपये मोबाइलमधून खर्च होतात.

Web Title: A mere 12-year-old boy blew away Rs 12 lakh in the Free Fire game

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.