पाय घसरल्याने विहिरीत पडून अल्पवयीन मुलीचा मृत्यू, इंदापूर तालुक्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2024 11:43 AM2024-06-25T11:43:48+5:302024-06-25T11:44:06+5:30
इंदापूर ( पुणे ) : पाणी आणण्यासाठी विहिरीवर गेलेल्या पंधरा वर्षांच्या मुलीचा पाय घसरल्याने ती विहिरीच्या पाण्यात बुडून मृत्यू ...
इंदापूर (पुणे) : पाणी आणण्यासाठी विहिरीवर गेलेल्या पंधरा वर्षांच्या मुलीचा पाय घसरल्याने ती विहिरीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी (दि. २४) राजवडी पाटी येथे घडली. सुमारे सहा तासांच्या अथक परिश्रमानंतर तिचा मृतदेह विहिरीबाहेर काढण्यात यश मिळाले आहे.
सारिका पिराजी शिंदे (वय १५, रा. मोंढा, परतूर, ता. परतूर, जि. जालना) असे या मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. सारिका ही आपल्या आई-वडिलांबरोबर मजुरीच्या कामासाठी राजवडी येथे आलेली होती. सोमवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या दरम्यान ती पाणी भरण्यासाठी शेजारच्या विहिरीवर आली. त्यानंतर बराच वेळ झाला तरी परतली नाही. त्यामुळे परिसरात तिच्या कुटुंबाने तिचा शोध सुरू केला. विहिरीजवळ आल्यानंतर तिने आपल्यासोबत नेलेल्या काही वस्तू विहिरीच्या कडेला आढळून आल्या.
पोलिस प्रशासन, महसूल यंत्रणा व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने विहिरीतील पाण्याचा साठा कमी करीत सारिकाला शोधण्याचे कार्य सुरू झाले. साडेसहा तासांनंतर दोघा तरुणांच्या हाती तिचा मृतदेह लागला. उत्तरीय तपासणीसाठी तो इंदापूर उपजिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला. दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यापासून तहसीलदार श्रीकांत पाटील, इंदापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सचिन खुडे, इंदापूरचे सहायक पोलिस निरीक्षक एस. ई. राऊत व त्यांचे सहकारी घटनास्थळी थांबून शोधकार्य राबवीत होते.
विहीर बुजवून टाकण्याबाबत दिले होते पत्र
पडीक असणारी; पण सध्या पाण्याने पूर्ण भरलेल्या या विहिरीला संरक्षक कठडे नाही. जिल्हा परिषदेच्या शाळेत जाणारी मुले विहिरीजवळूनच जातात. एखादी अप्रिय घटना घडू नये, याकरिता त्या विहिरीवर उंच रिंग उभारावी अथवा ती बुजवून टाकावी, असे पत्र बिजवडी ग्रामपंचायतीने चार दिवसांपूर्वी विहिरीची मालकी असणाऱ्या कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याच्या प्रशासनाला दिले होते अन् आजच ही दुर्दैवी घटना घडली. एका परगावच्या अल्पवयीन मुलीस अचानक मृत्यूस सामोरे जावे लागले. त्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.