पुण्यात अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन बलात्कार; आरोपीला १० वर्षे सक्तमजुरी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2022 11:20 AM2022-07-15T11:20:43+5:302022-07-15T11:30:41+5:30
पुणे : अल्पवयीन मुलीला पळवून नेत तिच्यावर अत्याचार करणाऱ्या तरुणास न्यायालयाने १० वर्षे सक्तमजुरी आणि १५ हजार रुपये दंडाची ...
पुणे : अल्पवयीन मुलीला पळवून नेत तिच्यावर अत्याचार करणाऱ्या तरुणास न्यायालयाने १० वर्षे सक्तमजुरी आणि १५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सत्र न्यायाधीश एस. जी. वेदपाठक यांनी हा निकाल दिला.
कार्तिक काशिनाथ कारागीर असे शिक्षा सुनावण्यात आलेल्याचे नाव आहे. ही घटना २०१६ साली उत्तमनगर भागात घडली होती. अल्पवयीन मुलीच्या आईने याबाबत २० नोव्हेंबर २०१६ रोजी उत्तमनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. त्यानुसार तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक निकम यांनी या गुन्ह्याचा तपास केला होता. कारागीर याला घटनेच्या दुसऱ्याच दिवशी अटक करून अल्पवयीन मुलीस ताब्यात घेण्यात आले होते. मुलगी व आरोपीचा वैद्यकीय तपासणी अहवाल या खटल्यात महत्त्वाचा ठरला. सरकारी वकील म्हणून हेमंत मेंडकी यांनी कामकाज पाहिले.
न्यायालयाने वेगवेगळ्या कलमांप्रमाणे कारागीर याला एकूण १० वर्षे कारावास व दंड अशी शिक्षा सुनावली. अल्पवयीन मुलीस पळवल्याबद्दल ५ वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंड, तर पोक्सो कायद्यानुसार १० वर्षे सक्तमजुरी आणि १० हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. दोन्ही शिक्षा या एकाच वेळी भोगावयाच्या आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील जैतापूरकर, पोलीस निरीक्षक अर्जुन बोत्रे (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली पैरवी अधिकारी गणेश माने यांनी खटल्यात मदत केली.