जेवण करण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीला घरी नेऊन अत्याचार
By नितीश गोवंडे | Updated: February 9, 2024 16:41 IST2024-02-09T16:40:32+5:302024-02-09T16:41:00+5:30
कोंढवा पोलिसांनी तरुणावर बलात्कारासह पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

जेवण करण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीला घरी नेऊन अत्याचार
पुणे : आईने जेवण करण्यासाठी घरी बोलवले असल्याचे सांगून एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला घरी नेले. त्याठिकाणी मुलीवर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. तसेच, याबाबत कुणाला सांगितले तर स्वत: आत्महत्या करण्याची धमकी दिल्याची घटना कोंढवा परिसरात घडली आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी तरुणावर बलात्कारासह पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत कोंढवा परिसरातील कामठे पाटील नगर येथे राहणाऱ्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीने गुरुवारी (दि. ८) कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून विवेक रामकृष्ण निमकरडे (१९, रा. येवलेवाडी, कोंढवा) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार २० नोव्हेंबर ते ७ डिसेंबर २०२३ या कालावधीत आरोपीच्या राहत्या घरी घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि पीडित तरुणी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. मुलगी येवलेवाडी येथील कॉलेजमध्ये गेली होती. त्यावेळी आरोपीने तुला माझ्या आईने जेवण करण्यासाठी घरी बोलवले असल्याचे सांगितले. तिला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून येवलेवाडी येथील त्याच्या घरी घेऊन गेला. त्याठिकाणी मुलीच्या इच्छेविरूद्ध जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. मुलीने त्याला प्रतिकार केला असता तिला हाताने मारहाण केली. तसेच याबाबत घरी किंवा कोणाला काहीही सांगितले तर मी माझ्याच जीवाचे बरेवाईट करुन घेईल. तुला व तुझ्या घरच्यांना अडकवीन अशी धमकी देखील दिली. यानंतर दुचाकीवरून घरी सोडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक बाबर करत आहेत.