आई-वडिलांनी पोटच्या मुलाला तब्बल २ वर्षे २२ कुत्र्यांसोबत कोंडले; पुण्यातील धक्कादायक प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2022 07:12 PM2022-05-11T19:12:26+5:302022-05-11T19:13:36+5:30
कोंढवा पोलिसांनी संबंधित दाम्पत्यावर बालसंगोपन व संरक्षण कायद्यातील विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला
पुणे: आपल्या पोटच्या ११ वर्षांच्या मुलाला तब्बल दोन वर्षे कुत्र्यांसोबत कोंडून ठेवल्याचा प्रकार कोंढवा येथे उघडकीस आला असून, कोंढवा पोलिसांनी संबंधित दाम्पत्यावर बालसंगोपन व संरक्षण कायद्यातील विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. कुत्र्यांसोबतच राहत असल्याने या मुलाचे वागणे त्यांच्यासारखेच झाल्याचे निदर्शनास आले. याबाबत बालकल्याण समितीच्या निर्णयानंतर त्याच्या पालकांना अटक करू, अशी भूमिका पोलिसांनी घेतली आहे.
याबाबत या सोसायटीतील जागरूक रहिवाशांनी या मुलाच्या दुर्दशेबद्दल ज्ञानदेवी चाइल्ड लाइनच्या अनुराधा सहस्त्रबुद्धे यांना कल्पना दिली. त्यानुसार त्यांच्या पथकाने या घराला भेट दिली. यावेळी त्यांनी मुलाच्या पालकांची कानउघाडणी केली. मात्र, दुसऱ्या दिवशी हे पथक पुन्हा आले असता घराला कुलूप लावलेले होते. खिडकीतून डोकावून पाहिले असता हा मुलगा या कुत्र्यांमध्ये बसलेला होता. घरातून दुर्गंधी येत होती. तसेच प्रचंड अस्वच्छता होती. याबाबत सहस्त्रबुद्धे म्हणाल्या, ‘या मुलाची सुटका केल्यानंतर तो कुत्र्यांसारखाच वागत असल्याचे निदर्शनास आले. तो काहीसा अशक्त दिसत होता. या प्रकारामुळे त्याच्या मानसिक आरोग्यावरही परिणाम झाला होता. त्याला समुपदेशनाची गरज आहे. त्याचे पालक त्याचा सांभाळ करू शकत नसल्याने त्याला बालकल्याण समितीकडे देण्यात आले आहे. हा प्रकार धक्कादायक आहे.’
याबाबत कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील म्हणाले, ‘प्राण्यांना व मुलांना एकत्र ठेवणे हा गुन्हा असून, या मुलाला सध्या बालकल्याण समितीच्या ताब्यात दिले आहे. समितीच्या निर्णयानंतर त्याच्या पालकांना अटक करण्यात येईल.’
कुुटुंबच कुत्र्यांसोबत
याबाबत सहस्त्रबुद्धे म्हणाल्या, ‘हे कुटुंबच सुमारे २२ कुत्र्यांसोबत राहत होते. मात्र, बाहेर जाताना त्या मुलाला घरातच कोंडून बाहेरून कुलूप लावून जात होते. मुलाला सोडविले त्यावेळी पालकांनी कोणताही विरोध केला नाही. कुत्र्यांच्या प्रेमापोटी आमचे लग्न झाले, त्यामुळे आम्ही कुत्रे पाळले. त्यांच्यासोबतच आम्ही राहतो. बाहेर कोरोना असल्याने मुलाला घरातच ठेवत होतो, असेही त्यांनी सांगितले. मात्र, सोसायटीतील त्याच्या मित्रांनी तो अनेकदा अंगावर यायचा. चावा घ्यायचा, असे सांगितले. हल्ली हा मुलगा कुत्र्यासारखा वागत असल्याचे शेजाऱ्यांनी सांगितले.’