पैशांची हाव ठरते फसवणुकीचा बळी; 'टास्क फ्रॉड'च्या जाळ्यात सुशिक्षित अडाणीच सर्वाधिक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2023 12:56 PM2023-05-12T12:56:34+5:302023-05-12T12:58:53+5:30

आयटी तरुणांना जमा असलेल्या पैशांचे नियोजन करून ते कुठे गुंतवले पाहिजे याबद्दलचे अज्ञान

A need for money makes one a victim of fraud Educated villagers are the most in the net of 'task fraud' | पैशांची हाव ठरते फसवणुकीचा बळी; 'टास्क फ्रॉड'च्या जाळ्यात सुशिक्षित अडाणीच सर्वाधिक

पैशांची हाव ठरते फसवणुकीचा बळी; 'टास्क फ्रॉड'च्या जाळ्यात सुशिक्षित अडाणीच सर्वाधिक

googlenewsNext

पुणे : सायबर फसवणुकीत बळी पडलेल्यांमध्ये तंत्रज्ञान जाणणारे आणि सुशिक्षितांची संख्या सर्वाधिक असल्याचे दिसत आहे. त्यामुळे या वर्गाला काही जण सुशिक्षित अडाणी म्हणत आहेत. टास्क फ्रॉडचे चालू वर्षात आतापर्यंत एकूण १८ गुन्हे शिवाजीनगर येथील सायबर पोलिस ठाण्यात दाखल झाले आहेत. ज्या पिढीला आपण इंटरनेटचे सर्वात जाणकार आहोत असे वाटते, त्यांचीच फसवणूक या टास्क फ्रॉडमध्ये मोठ्या प्रमाणात होत असल्याची माहिती सायबर पोलिसांनी दिली.

गेल्या पंधरा दिवसांपासून टास्क फ्रॉड अंतर्गत दाखल होणाऱ्या गुन्ह्यांचे प्रमाण लक्षणीय आहे. टास्क फ्रॉडच्या गुन्ह्यांचे जवळपास ८० टक्के बळी हे तंत्रज्ञानाचे संपूर्ण ज्ञान असलेल्या सुशिक्षितांमधीलच असल्याचे सायबर ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक तुषार भोसले यांनी सांगितले.

'टास्क फ्रॉड' म्हणजे काय?

अनोळखी मोबाइल क्रमांकावरून 'पार्ट टाइम जॉब'च्या नावाखाली मेसेज येतो. त्यामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचे टास्क दिलेले असतात. दिलेले टास्क पूर्ण केले तर त्याचा चांगला परतावा मिळेल, असा मजकूर मेसेजमध्ये असतो. सुरुवातीला चांगला मोबदला देऊन विश्वासात घेतले जाते. त्यानंतर जास्तीच्या परताव्याचे आमिष दाखवून 'प्री-पेड' टास्क किंवा 'व्हीआयपी मेम्बरशिप'च्या नावाखाली डिपॉझिट भरा, अशी मागणी केली जाते. त्यानंतर परतावा मिळण्याचे बंद झाल्यावर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येते.

का फसतात आयटी तरुण?

- सोप्या मार्गाने पैसे कमवण्याच्या लालसेला बळी पडून
- जमा असलेल्या पैशांचे नियोजन करून ते कुठे गुंतवले पाहिजे याबद्दलचे अज्ञान.
- अल्पावधीत मोठा नफा मिळवण्याची जिज्ञासा.

ही घ्या काळजी 

- अनोळखी मोबाइल नंबरवरून आलेल्या कुठल्याही लिंकवर क्लिक करू नका.
- अनोळखी नंबरवरून आलेल्या मेसेजेसची शहानिशा करून घ्या.
- घरबसल्या फक्त लाइक, सब्स्क्राइब, रिव्ह्यू देऊन पैसे मिळत नाहीत त्यामुळे अशा मेसेजकडे दुर्लक्ष करा.
 
''सध्या तरुणाईमध्ये अधिक पैसे कमावण्याची क्रेज वाढत आहे. त्यातच आयटी क्षेत्रात सर्वांना समान पॅकेज नसते त्यामुळे हातात जॉब असताना सुद्धा पार्ट टाइम काही करता येईल का? या शोधात ही तरुणाई असते. याच जिज्ञासेला बळी पडून त्यांच्यासोबत अशा प्रकारचे फ्रॉड होतात. - कल्पक कुलकर्णी, प्रॉडक्ट इंजिनिअर, आयटी क्षेत्र'' 

''वाढती फसवणुकीची प्रकरणे बघता सायबर सिक्युरिटीबाबत जनजागृती करणे आणि पार्ट टाइम जॉबमध्ये फॅक्ट चेक करणे गरजेचे आहे. अशा प्रकारचे मेसेज आले तर आधी कंपनीची सत्यता पडताळून बघणे महत्त्वाचे आहे. - तुषार भोसले, पोलिस उपनिरीक्षक, सायबर पोलिस ठाणे.'' 

Web Title: A need for money makes one a victim of fraud Educated villagers are the most in the net of 'task fraud'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.