वाहतूक नियमभंगाच्या बनावट संदेशाचे जाळे! सायबर चोरट्यांची नवीन शक्कल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2023 01:34 PM2023-08-31T13:34:37+5:302023-08-31T13:35:19+5:30

या पार्श्वभूमीवर वाहनचालकांनी अशा प्रकारच्या संदेशास प्रतिसाद देऊ नये, तसेच सायबर चोरट्यांपासून सावध राहावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे....

A network of fake traffic violation messages! A new breed of cyber thieves | वाहतूक नियमभंगाच्या बनावट संदेशाचे जाळे! सायबर चोरट्यांची नवीन शक्कल

वाहतूक नियमभंगाच्या बनावट संदेशाचे जाळे! सायबर चोरट्यांची नवीन शक्कल

googlenewsNext

पुणे : सायबर चोरटे नागरिकांची फसवणूक करण्यासाठी नवनवीन शक्कल लढवतात. आता वाहतूक नियमभंग केल्याप्रकरणी सायबर चोरट्यांनी दंडाचा बनावट संदेश तयार केला असून, तो समाजमाध्यमात प्रसारित केला आहे. या पार्श्वभूमीवर वाहनचालकांनी अशा प्रकारच्या संदेशास प्रतिसाद देऊ नये, तसेच सायबर चोरट्यांपासून सावध राहावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.

मागील काही वर्षांपासून सायबर गुन्ह्यांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. बदलत्या ट्रेंडनुसार सायबर चोरटे सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख वाढवीत भेटवस्तू पाठविण्याचे आमिष, स्वस्तात दुचाकी, गृहोपयोगी वस्तू विक्री, ऑनलाइन टास्क, नोकरीचे आमिष दाखवून नागरिकांना जाळ्यात ओढतात. पुणे शहरात नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवरील थकीत दंडाचे प्रमाण मोठे आहे. चोरट्यांनी नेमकी ही बाब लक्षात घेत वाहतूक नियमभंग दंडाचा बनावट संदेश प्रसारित करण्यास सुरुवात केली आहे. वाहतूक नियमभंग दंडाच्या संदेशात सायबर चोरट्यांनी एक लिंक पाठविली आहे. या लिंकमधील शब्दात फेरफार करण्यात आला आहे. अशा प्रकारच्या संदेशाला प्रतिसाद दिल्यास आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता आहे.

वाहन चालकांना थकीत दंडाचा अधिकृत संदेश पोलिसांकडून पाठविण्यात येतो. मात्र, या संदेशात छायाचित्र नसते. सायबर चोरट्यांनी संदेशात लिंक पाठविली आहे. या लिंकमधील शब्दात फेरफार करण्यात आला आहे. नागरिकांनी अशा प्रकारच्या संदेशाला प्रतिसाद देऊ नये, असे वाहतूक शाखेच्या वतीने सांगण्यात आले.

नागरिकांनी सायबर चोरट्यांच्या बनावट संदेशाला प्रतिसाद देऊ नये. तसेच या प्रकारचा संदेश आल्याचे आढळून आल्यास त्वरित पोलिसांकडे तक्रार द्यावी. प्रसारित झालेल्या बनावट मेसेज बाबत सायबर पोलिसांना माहिती देण्यात आली आहे.

- विजयकुमार मगर, पोलिस उपायुक्त, वाहतूक शाखा

Web Title: A network of fake traffic violation messages! A new breed of cyber thieves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.