गंडा घालण्याचा नवा फंडा! एक कोटीचे ट्रान्झेक्शन केल्यास १ तोळा सोने फ्री, चौघांची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2023 02:29 PM2023-01-08T14:29:43+5:302023-01-08T14:29:50+5:30
स्कीमचे चौघांना आमिष दाखवून लाखो रुपये लुटले
पुणे: सध्या सर्वत्र ऑनलाइन व्यवहार मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे उलाढाल वाढली आहे. त्याचा गैरफायदा घेऊन एकाने व्यावसायिकांना तुम्ही महिन्याभरात एक कोटीची ट्रान्झेक्शन केल्यास त्यावर एक तोळा सोने देण्याचे आमिष दाखवून त्यांना लाखो रुपयांना गंडा घातल्याचे समोर आले आहे.
याप्रकरणी बिबवेवाडी येथील एका २८ वर्षांच्या व्यावसायिकाने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी चेतन अनिल गादेकर (वय २७, रा. टिळेकरनगर, कोंढवा) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २१ जून २०२२ पासून आतापर्यंत घडला आहे. आरोपीने अनेक जणांना गंडा घातला असून आतापर्यंत ४ जणांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा अप्पर इंदिरानगर येथे व्यवसाय आहे. आरोपी चेतन याने फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला. भारत पेचे मशीनवरून महिन्याला १ कोटी रुपयांचे ट्रान्झेक्शन केल्यास त्यातून फायदा मिळेल. त्यामधून फिर्यादी यांना एक तोळे सोने देण्याचे आमिष दाखविले. त्यांच्याकडून या स्कीमसाठी ९ लाख ९ हजार ७६५ रुपये घेतले. अशाच प्रकारे त्याने या परिसरातील आणखी ३ जणांना स्कीमचे आमिष दाखवून त्यांच्याकडून काही लाख रुपये लाटले. परंतु, त्यांना कोणताही फायदा न देता त्यांची फसवणूक केली आहे. चेतन याने आणखी काही जणांची फसवणूक केली असल्याची शक्यता असून सहायक पोलीस निरीक्षक बरडे तपास करीत आहेत.