भिडे वाड्याच्या विकासासाठी पालिकेकडून नवा आराखडा; पुढील महिन्यात भूमिपूजन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2023 09:48 AM2023-11-07T09:48:13+5:302023-11-07T09:48:24+5:30
तंत्रज्ञानाचा वापर करण्याबराेबरच महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या जीवनातील पैलू मांडले जाणार
पुणे: भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक हाेण्यासाठी सरकारचे प्रयत्न असून, जागेचा ताबा मिळत नव्हता. अखेर सर्वोच्च न्यायालयाने हा प्रश्न निकाली काढत एका महिन्याच्या आत जागा महापालिकेला देण्याचे आदेश याचिकाकर्त्यांना दिले आणि राष्ट्रीय स्मारकाच्या कामाला गती मिळाली आहे. यात आता राष्ट्रीय स्मारकाला साजेसा पुनर्विकास करण्याच्या दृष्टीने महापालिकेने नवा आराखडा तयार करण्याचे ठरविले आहे.
महापालिकेने यापूर्वी केलेल्या विकास आराखड्यास १० वर्षे होऊन गेल्याने बदलत्या काळानुसार त्यात बदल करण्यासाठी नवा आराखडा करण्याचे काम हाती घेतले आहे. यात तंत्रज्ञानाचा वापर करण्याबराेबरच महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या जीवनातील पैलू मांडले जाणार आहेत.
बदल का केला?
पूर्वीच्या संकल्पचित्रात सध्या असलेली दुकाने दाखविलेली होती; पण सर्वोच्च न्यायालयाने भिडे वाड्याची संपूर्ण जागा महापालिकेच्या ताब्यात देण्याचे आदेश जागा मालक व भाडेकरूंना दिले आहे. त्यामुळे नव्याने आराखडा तयार केला जाणार आहे.
महिनाभरात द्या जागेचा ताबा
महात्मा जाेतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी १ जानेवारी १८४८ राेजी बुधवार पेठेतील भिडे वाड्यात देशातील पहिली मुलींची शाळा सुरू केली. या कार्यास अभिवादन करण्यासाठी आणि त्यांच्या आठवणी जपण्यासाठी भिडे वाड्याचे राष्ट्रीय स्मारक झाले पाहिजे, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत हाेती. या संदर्भात अनेक वेळा आंदोलने झाली. त्याविरोधातील लढा तब्बल १३ वर्षांनंतर महापालिकेने उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयातही जिंकला आहे. यात सर्वाेच्च न्यायालयाने ती जागा एका महिन्यात महापालिकेच्या ताब्यात घेण्याचे आदेश दिले आहेत. मोडकळीस आलेल्या भिडे वाड्याचा पुनर्विकास करण्याचा निर्णय घेतल्यानंतर महापालिकेने २०१२-१३ मध्येच वास्तू विशारद यांच्याकडून त्याचा आराखडा तयार करून घेतला होता.
पूर्वीच्या आराखड्यात काय हाेते?
- दाेन हजार फुटांचा दोन मजली कौलारू वाडा.
- तळ मजल्यावर सावित्रीबाई फुले यांचा पुतळा.
- एका वर्गात सावित्रीबाई फुले शिकवत आहेत, मुख्याध्यापकांचे कार्यालयही तेथे असेल.
- पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर बहुउद्देशीय हॉल, ग्रंथालय, शिक्षकांची खोली, सभागृह, आदी.
भिडेवाड्याची जागा एक महिन्यामध्ये ताब्यात मिळणार आहे. त्यानुसार वास्तू विशारद यांच्याकडून आराखडा तयार करून घेण्याची सूचना दिली आहे. तसेच पुढील महिन्यात भिडे वाडा राष्ट्रीय स्मारकाचे भूमिपूजन होणार आहे. - विक्रम कुमार, आयुक्त, महापालिका