मेंदूज्वरावर सिरमने बनवली नवी लस; Meningitis वरील लसीला WHO ची परवानगी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2023 08:27 PM2023-07-14T20:27:40+5:302023-07-14T20:28:55+5:30
२०३० पर्यंत हा आजार पूर्णपणे नियंत्रणात आणणारी ठरेल, अशी प्रतिक्रिया युनायटेड किंगडमचे आंतरराष्ट्रीय विकास मंत्री अँड्रयू मिशेल यांनी दिली आहे...
पुणे : सिरम इन्स्टिट्यूटने विकसित केलेल्या मेंदूज्वर (मिनिंजायटीस) यावरील लसीला जागतिक आरोग्य संघटनेने प्राथमिक स्वरूपात परवानगी दिली आहे. तब्बल २६ देशांमध्ये या लसीची गरज आहे. तसेच ही लस परवडणारी असल्याने आणि मेंदूज्वरासारखे विकार नियंत्रित आणणारी ठरेल. तसेच २०३० पर्यंत हा आजार पूर्णपणे नियंत्रणात आणणारी ठरेल, अशी प्रतिक्रिया युनायटेड किंगडमचे आंतरराष्ट्रीय विकास मंत्री अँड्रयू मिशेल यांनी दिली आहे.
मिनिंजायटीस या प्राणघातक रोगाच्या पाच प्रमुख कारणांपासून संरक्षण करणारी पहिली लस असणार आहे. आफ्रिका आणि त्या पट्ट्यातील देशांमध्ये प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात असलेल्या विविध ज्वरांवर ही गुणकारी ठरणार आहे, अशी माहिती सिरमचे कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी दिली.
काय आहे मिनिंजायटीस
‘मेनिन्गोकोकल मिनिंजायटीस’ हा एक जीवाणूजन्य संसर्ग आहे. यामुळे बाळाच्या मेंदूचे गंभीर नुकसान होऊ शकते. यावर वेळीच उपचार न केल्यास ५० टक्के प्रकरणांमध्ये प्राणघातक ठरते. हा आजार कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला होऊ शकतो, परंतु तो लहान मुलांवर अधिक गंभीर परिणाम करतो.