Omicron | पुण्यात आढळला कोरोनाचा नवा व्हेरियंट 'बी क्यू १.१'
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2022 11:04 AM2022-11-15T11:04:10+5:302022-11-15T11:05:01+5:30
या रुग्णाचा आयर्लंड प्रवासाचा इतिहास असून, त्याला सौम्य स्वरूपाचा आजार होता..
पुणे :पुणे शहरात २९ वर्षांच्या तरुणामध्ये कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन गटातील बी क्यू १.१ हा नवीन व्हेरियंट आढळून आला आहे. या रुग्णाचा आयर्लंड प्रवासाचा इतिहास असून, त्याला सौम्य स्वरूपाचा आजार होता. ताे विलगीकरणात बरा झाला असून, त्याने कोविशिल्ड लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत. बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाने याबाबतचा अहवाल दिला आहे.
दरम्यान, राज्यात याआधीच एक्सबीबी हा नवीन व्हेरियंट आढळला हाेता. त्याचे मुंबई (७२), पुणे (२९) ठाणे (८), नागपूर, भंडारा प्रत्येकी २, अकोला, अमरावती, रायगड - प्रत्येकी १ असे एकूण ११६ रुग्ण सापडले आहेत. मात्र या भागात कोविड प्रसाराचा वेग, रोगाची तीव्रता वाढलेली नाही.
३१ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर आणि ७ नोव्हेंबर ते १३ नोव्हेंबर या मागील दोन आठवड्यांचा आढावा घेतला असता सप्ताहातील दैनंदिन कोविड रुग्णांमध्ये १६५९ पासून १०३७ पर्यंत म्हणजे ३७.४९ टक्के घट झालेली आहे. या आठवड्यामध्ये राज्यात कोविडमुळे झालेल्या मृत्यूंची संख्या ७ असून, मागील चार आठवड्यांमध्ये ती तेवढीच राहिलेली आहे.