बारामतीत शहरातील सूर्यनगरी भागात नवजात अर्भकाचे शीर सापडले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2024 09:13 AM2024-01-04T09:13:35+5:302024-01-04T09:13:42+5:30
बारामती तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे...
बारामती (पुणे) : बारामती शहरातील सूर्यनगरी भागात अमानुषतेचा कळस गाठणारा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या ठिकाणी नवजात बालकाचे शीर आढळून आल्याने बारामती हादरली आहे. सूर्यनगरी परिसरात आढळलेले हे शीर नुकत्याच जन्माला आलेल्या नवजात बाळाचे आहे. केवळ शीर शिल्लक राहिलेले हे अर्भक आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. बारामती तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.
या बाळाचा घातपात झाला की कुत्र्यांनी या बाळाचा शरीराचा भाग खाऊन टाकला, किंवा अंधश्रद्धेचा प्रकार आहे, याबाबत पोलिसांचा तपास सुरू आहे. सध्या रुई ग्रामीण रुग्णालयात या जन्मजात बाळाचे शवविच्छेदन केले जात आहे. याबाबत पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले की नवजात अर्भकाचे शीर सापडले आहे, त्याचे शवविच्छेदन करण्यात येत आहे. पोलीस याबाबत तपास करीत आहेत. सूर्यनगरी भागात निर्जन ठिकाणी अर्भकाचे शीर सापडल्याचे मोरे यांनी सांगितले.