तुमच्या नावे ड्रग्जचं पार्सल पाठवलंय; तरुणी आणि आईची तब्बल ५३ लाखांची फसवणूक
By भाग्यश्री गिलडा | Published: August 9, 2023 03:11 PM2023-08-09T15:11:07+5:302023-08-09T15:11:31+5:30
तुमच्या पार्सलमध्ये अंमली पदार्थ सापडले असून ती कारवाई टाळण्यासाठी ५३ लाख ऑनलाईन ट्रान्सफर करावे लागतील
पुणे: तुमच्या नावाने मुंबई ते तैवान पाठवण्यात आलेल्या पार्सलमध्ये अमली पदार्थ सापडल्याचे सांगून २५ वर्षीय तरुणी आणि तिच्या आईची फसवणूक केल्याचा प्रकार पुण्यात घडला आहे. तरुणीला अनोळखी क्रमांकावरून फोन येऊन कुरिअर ऑफिसमधून बोलत असल्याचे सांगितले. तुम्ही पाठवलेल्या पार्सलमध्ये ड्रग्स आहेत म्हणून तुमचे पार्सल मुंबई येथे अडकले आहे असे सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणीला अज्ञात व्यक्तीने ५ जुलै रोजी संपर्क साधला .आपण मुंबई अँटी नार्कोटीक्स विभागतून बोलत असल्याचे सांगून, तशा प्रकारचा स्काईप प्रोफाइल नाव असलेलं स्काईप अकाउंटधारक याने फेडेक्स कंपनी व पोलीस असल्याची बतावणी केली. तसेच तरुणीच्या नावाने मुंबई ते तैवान पार्सल पाठवण्यात आले आहे, त्यामध्ये अमली पदार्थ सापडलेले आहेत असे सांगून याप्रकरणी कारवाई टाळण्यासाठी तसेच तक्रारदार व तिच्या कुटुंबियांचे बँक खाते व्हेरिफाय करण्याचे सायबर भामट्यानी सांगितले. त्यानुसार तक्रारदार हिच्या आईला ५३ लाख ६३ हजार रुपये ऑनलाईन ट्रान्सफर करण्यास सांगितले. याप्रकरणी अज्ञात मोबाईलधारक, स्काईप प्रोफाइल धारक तसेच पंजाब नॅशनल बँकेचा खातेदार यांच्या विरोधात सायबर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याबाबत सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत पुढील तपास करत आहे.
अशी घ्या काळजी
- तुम्ही पार्सल पाठवलेले नसल्यास घाबरून जाण्याचे कारण नाही.
- असा फोन आल्यास सर्वात आधी सायबर पोलिसांना कळवा
- कोणतेही एप्लिकेशन डाऊनलोड करू नये.
- कोणत्याही लिंकवर क्लिक करू नये.
फसवणुकीची कुठे कराल तक्रार?
सायबर फ्रॉड अडीच लाखांच्या आतील असेल तर हद्दीतील पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवता येते. जर सायबर फसवणुकीमध्ये गेलेली रक्कम अडीच लाखांपुढील असेल तर शिवाजीनगर येथे असलेल्या सायबर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवता येते. ७०५८७१९३७१/ ७०५८७१९३७५ या मोबाईल क्रमांकावर फोन करूनही तक्रार नोंदवता येते. तसेच crimecyber.pune@nic.in या पत्त्यावर ई-मेल द्वारे तक्रार नोंदवता येते.