प्रवाशाला हार्ट अटॅक; पीएमपी चालक-वाहक ठरले देवदूत, गाठले थेट रुग्णालय, प्रवासी सुखरूप
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2024 12:52 PM2024-10-01T12:52:33+5:302024-10-01T12:53:49+5:30
रुग्णवाहिका बोलावण्याइतपत वेळ नसल्याने प्रसंगावधान साधून दोघांनीही त्वरित निर्णय घेतला, बसमधून एक हात सातत्याने हॉर्नवर ठेऊन त्वरित ससून रुग्णालय गाठले
फुरसुंगी : भेकराईनगर ते आळंदी या बसमध्ये रात्री ९ वाजता एका प्रवाशाला हृदयविकाराचा झटका आला. यावेळी पीएमपीचालक बसलाच रुग्णवाहिका करत, तर बसचा वाहकाने प्रथमोपचार करत प्रवाशाला रुग्णालयात पोहोचवले. त्यामुळे उपचार भेटल्याने प्रवाशाचे प्राण वाचले जातात.
या देवदुतांचे नाव बालाजी गायकवाड आणि सुनील करंडे आहे. दोघेही फुरसुंगीतील भेकराईनगर येथील पीएमपी आगारात इलेक्ट्रिक बसवरील चालक आणि वाहक म्हणून काम करत आहेत. बुधवारी रात्री नेहमीप्रमाणे ते भेकराईनगर ते आळंदी या मार्गावरील बसवर कर्तव्यावर होते. रात्री ९ वाजता गाडी आळंदीकडे मार्गस्थ झाली. भैरोबानाला येथे गाडी आल्यानंतर एका प्रवाशाच्या छातीत जास्त दुखू लागले. वाहक सुनील यांनी ही बाब चालकास सांगितली. गाडी थांबवून प्रवाशाची अवस्था पाहिली, मात्र त्याला रुग्णालयात दाखल करणे आवश्यक दिसत होते. रुग्णवाहिका बोलावण्याइतपत वेळ हाती नसल्याने प्रसंगावधान साधून दोघांनीही त्वरित निर्णय घेतला.
वाहकाला त्याचे हातपाय आणि छाती चोळायला सांगून प्रथमोपचार करत बालाजीने गाडी तातडीने ससून रुग्णालयाकडे वळवली. नागरिकांनी रस्ता द्यावा यासाठी बालाजीने एक हात सातत्याने हॉर्नवर ठेऊन त्वरित ससून रुग्णालय गाठले. प्रवाशाला दवाखान्यात दाखल करून डॉक्टरांना उपचार करण्यास सांगितले. योग्य वेळेत उपचार मिळणे शक्य झाल्याने प्रवाशाचे प्राण वाचले. बालाजी आणि सुनील या दोघांनी दाखविलेली तत्परता आणि त्वरित घेतलेल्या योग्य निर्णयाचे नागरिकांकडून कौतुक होत आहे. दोन देवदूतांचा कै. सौ. शुभांगी श्रीकांत प्रतिष्ठानतर्फे माजी नगरसेवक मारुती तुपे यांच्या हस्ते शाल, श्रीफल व सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी संस्थापक श्रीकांत तांबे, वरीष्ठ उपअभियंता नंदकुमार खलाढकर, विजय मारूळकर, देशपांडे, जयंत खाडीलकर, बाळासाहेब झांबरे व स्वप्नलोक सोसायटीमधील महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या.