उपचारासाठी आलेल्या रुग्णाची सरकारी डॉक्टरला मारहाण; खेडच्या ग्रामीण रुग्णालयातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2023 06:46 PM2023-03-12T18:46:32+5:302023-03-12T18:46:48+5:30
रुग्ण हनुमंत सोपान वाडेकर ( रा. वाडेकर स्थळ शिरोली ता. खेड ) याच्याविरुद्ध खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
राजगुरुनगर: उपचारासाठी आलेल्या रुग्णाकडून सरकारी डॉक्टरला मारहाण झाल्याची घटना दि १२ रोजी चांडोली ग्रामीण रुग्णालयात घडली आहे. वैद्यकिय अधिकारी प्रविणकुमार पांडूरंग इंगळे यांनी रुग्ण हनुमंत सोपान वाडेकर ( रा. वाडेकर स्थळ शिरोली ता. खेड ) याच्याविरुद्ध खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
या घटनेबाबत सविस्तर माहिती अशी की, डॉक्टर प्रवीण कुमार इंगळे ग्रामीण रुग्णालय चांडोली येथे वैद्यकीय अधिकारी म्हणुन शासकीय सेवेत कार्यरत आहेत. आरोपी हनुमंत वाडेकर हा कीटकनाशक औषध प्यायल्याने चांडोली ग्रामीण रुग्णालयात नातेवाईकांनी उपचारासाठी आणले होते. डॉक्टर इंगळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तात्काळ वाडेकर याच्यावरती उपचार सुरू केले होते. दरम्यान वाडेकर यांने उपचार करण्यास विरोध करून मोठमोठ्याने आरडाओरडा करुन "माझ्या अंगाला हात लावायचा नाही" असे म्हणून शिवीगाळ केली. डॉक्टर यांच्या टी शर्टची कॉलर पकडून टी शर्ट फाडून दोन चापटी कानशिलात मारल्या .कॉटला खोचलेला सलाईन अडकविण्याचा लोखंडी रॉड घेवून मारण्यासाठी डॉक्टर इंगळे यांच्या अंगावर धावून गेला.या घटनेबाबत रुग्ण वाडेकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास खेड पोलीस करत आहे.