Pune | पुणे शहरात सराईत गुन्हेगाराकडून पिस्टल, गावठी कट्ट्यासह दोन जिवंत काडतुसे हस्तगत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2023 08:31 AM2023-04-27T08:31:04+5:302023-04-27T08:32:08+5:30
गुन्हे शाखेच्या युनिट-२ची कारवाई...
पुणे : शहरात बेकायदा पिस्टल व गावठी कट्टे बाळगणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मोहीम पोलिसांकडून राबवली जात आहे. दरम्यान, गुन्हे शाखेच्या युनिट- २ने एका सराईत गुन्हेगाराकडून एक पिस्टल, एक गावठी कट्टा यांसह दाेन जिवंत काडतुसे हस्तगत केली आहेत.
शफी शेख (३८, रा. आशोका सुमित सोसायटी, मिठानगर, कोंढवा खुर्द) असे शस्त्रास्त्र बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. गुन्हे शाखेच्या युनिट- २ चे प्रभारी अधिकारी क्रांतीकुमार पाटील, उपनिरीक्षक नितीन कांबळे व पोलिस अंमलदार यांचे एक पथक तयार करण्यात आले आहे.
या पथकातील उपनिरीक्षक कांबळे, पोलिस हवालदार शंकर नेवसे, पोलिस नाईक गणेश थोरात, साधना ताम्हाणे, समीर पटेल, कादिर शेख, पुष्पेंद्र चव्हाण यांचे पथक २६ एप्रिल रोजी गस्तीवर असताना त्यांनी शफी शेख याला ताब्यात घेत त्याच्याकडून ७४ हजार रुपयांचे १ पिस्टल, १ गावठी कट्टा आणि २ जिवंत काडतुसे हस्तगत केली. शफी शेखविरोधात कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.