पुण्यात दारुच्या नशेत चालकाने पीएमपी बस धडकविली सिग्नलला
By विवेक भुसे | Published: July 16, 2022 04:31 PM2022-07-16T16:31:02+5:302022-07-16T16:34:01+5:30
पीएमपीची पुढची काच फुटून नुकसान...
पुणे : रात्री उशिरा दारुच्या नशेत बस चालवून ती वारजे पुलाखालील सिग्नलला धडकविली. त्यात सिग्नलचे आणि पीएमपीची पुढची काच फुटून नुकसान झाले. याप्रकरणी वारजे पोलिसांनी पीएमपी बसचालक अनिल नामदेव केंजळे (वय ५०, रा. आनंद पार्क सोसायटी, वडगाव शेरी) याला अटक केली आहे.
याप्रकरणी पोलीस शिपाई किशोर नेवसे यांनी वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना वारजे पुलाखाली बुधवारी रात्री ११ वाजता घडला. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल केंजळे हे नशेमध्ये पीएमपी बस घेऊन चालले होते. त्यांनी नशेत वारजे पुलाखालील सिग्नलच्या खांबाला धडकून दुभाजकाला धडक दिली. त्यात सिग्नलचे नुकसान झाले. बसची पुढील काच फुटली.
वारजे पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहचले. तेव्हा पोलीस उपनिरीक्षक होळकर यांनी चालकाला ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठविले. त्यात केंजळे नशेच्या अंमलाखाली असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.