चोरी झालेली कार परत मिळवून देण्यासाठी पोलीस उपनिरीक्षकाने मागितली ५० हजारांची लाच
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2023 10:04 AM2023-04-06T10:04:43+5:302023-04-06T10:04:52+5:30
लाचलुचपत विभागाच्या कारवाईनंतर पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल
पुणे/किरण शिंदे: चोरी झालेली एर्टिगा कार परत मिळवून देण्यासाठी केलेल्या मदतीचा मोबदला म्हणून पन्नास हजार रुपये लाचेची मागणी करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत विभागाने बुधवारी रात्री ही कारवाई केली आहे. शशिकांत नारायण पवार असे गुन्हा दाखल झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. ते पुणे पोलीस आयुक्तालयातील सिंहगड रोड पोलीस स्टेशन येथे नेमणुकीस आहेत. याप्रकरणी एका 22 वर्षीय तरुणाने तक्रार दिली होती.
या प्रकरणी अधिक माहिती अशी की, तक्रारदार तरुणाच्या मालकीची मारुती इर्टीगा कार त्यांचा बदली ड्रायव्हर परस्पर घेऊन कर्नाटकमध्ये निघून गेला होता. ही कार परत मिळवण्यासाठी तक्रारदार तरुणाने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. ती कार परत मिळवून देण्यासाठी केलेल्या मदतीचा मोबदला म्हणून शशिकांत पवार यांनी पन्नास हजार रुपये लाचेची मागणी केल्याची तक्रार लाचरुचपत विभागाला मिळाली होती.
विभागाच्या अधिकाऱ्यांनी या तक्रार अर्जाची पडताळणी केली असता पोलीस उपनिरीक्षक शशिकांत पवार यांनी तक्रारदार तरुणाकडे सुरुवातीला 50 हजार रुपये आणि तडजोडीअंती वीस हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात शशिकांत पवार यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पाचरुचपत विभागाच्या पोलीस उपअधीक्षक विजयमाला पवार करत आहेत.