Anti Corruption Bureau: पोलीस कर्मचाऱ्याला ७ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2022 10:15 AM2022-09-07T10:15:18+5:302022-09-07T10:15:34+5:30
दुचाकीस्वाराकडून कारवाई न करण्यासाठी १० हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीअंती ७ हजार रुपयांची मागणी करून ती स्वीकारताना पकडले
चाकण : वाहतूक पोलीसाने ताब्यात घेतलेली दुचाकी कारवाई न करता परत देण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्याने हाताखालील मदतनीसाच्या सहाय्याने दुचाकीस्वाराकडून सात हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले. बावीस वर्षीय दुचाकी चालकाने दिलेल्या तक्रारीवरून लोकसेवक आप्पासाहेब अंबादास जायभाय ( वय.३२ वर्षे,पोलीस कॉन्स्टेबल,चाकण वाहतूक विभाग,पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय), किशोर भगवान चौगुले ( वय.४३ वर्षे,वाहतूक नियमनासाठी नेमलेला खाजगी मदतनीस ) यांच्यावर गुन्हा दाखल करून दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
याबाबत माहिती देताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, चाकण वाहतूक विभागाच्या वाहतूक पोलीस आप्पासाहेब जायभाय आणि ट्रॅफिक वार्डन यांनी एका दुचाकीस्वार वाहतूक नियम तोडल्यामुळे स्पायसर चौक पकडले होते. या वाहतूक पोलिसाने व त्याच्या मदतनीसाने दुचाकीस्वाराकडून कारवाई न करण्यासाठी १० हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीअंती ७ हजार रुपयांची मागणी करून ती स्वीकारताना वरील दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
त्यामुळे दुचाकीस्वाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागकडे याबाबत तक्रार केली होती. त्यानुसार स्पायसर चौक येथे सापळा रचून ही कारवाई करण्यात आली आहे. त्याच्याकडून तडजोडीनंतर लाचेची रक्कम कमी करून सात हजार रुपये करण्यात आली. ही सात हजार रुपये रक्कम स्वीकारताना वाहतूक पोलीस आणि त्याच्या मदतनीसाला ताब्यात घेण्यात आले आहे. सहायक पोलीस आयुक्त ला.प्र.वि. श्रीमती शितल घोगरे,पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे,अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव आदींनी ही कारवाई केली.