विवाहित असतानाही अनेक तरुणींशी संबंध ठेवणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला कामावरून काढले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2022 02:01 PM2022-10-30T14:01:25+5:302022-10-30T14:01:41+5:30
वेगवेगळ्या मुलींसोबत प्रेमसंबंध ठेवून पत्नीचा विश्वासघात करून पत्नीला लोणावळा येथे नेऊन संपवून टाकीन अशी धमकी दिली होती
पुणे : विवाहित असतानाही अनेक तरुणींशी संबंध ठेवणारा व घटस्फोट झाला नसतानाही दुसऱ्या महिला पोलीस शिपायाला लग्नाची मागणी घालणाऱ्या पोलीस शिपायाला पुणे शहर पोलीस दलातून बडतर्फ करण्यात आले आहे. हेमंत नथ्थू रोकडे असे या पोलीस शिपायाचे नाव आहे. रोकडे याची वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात नेमणूक होती.
हेमंत रोकडे याच्याविरुद्ध २ जानेवारी २०२१ रोजी औरंगाबाद ग्रामीणअंतर्गत कन्नड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. रोकडे याचा ६ मे २०१८ रोजी विवाह झाला होता. विवाहानंतरही वेगवेगळ्या मुलींसोबत प्रेमसंबंध ठेवून व्हॉट्सॲप चॅटिंग करणे, विवाहित असताना व घटस्फोट झालेला नसताना पोलीस मुख्यालय येथील एका महिला पोलीस अंमलदाराशी प्रेमसंबंध ठेवून तिला लग्नाची मागणी घातली होती. तसेच वेगवेगळ्या मुलींसोबत प्रेमसंबंध ठेवून पत्नीचा विश्वासघात करून पत्नीला लोणावळा येथे नेऊन संपवून टाकीन अशी धमकी दिली होती.
गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याची विभागीय चौकशी करण्यात आली. त्याला तो केवळ एकदा जबाब नोंदविण्यासाठी हजर राहिला. त्यानंतर चौकशीला त्याने सहकार्य केले नाही. त्यामुळे एकतर्फी झालेल्या या विभागीय चौकशीत हेमंत रोकडे याने आपल्या कृतीने पोलिसांची प्रतिमा मलीन केली असल्याचे दिसून आल्याने अपर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे यांनी त्याला पोलीस सेवेतून बडतर्फ केले आहे.