छत्तीस प्रवासी घेऊन जाणारी खासगी बस १५ ते २० फूट खाली कोसळली; बावधन मधील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2023 12:30 PM2023-03-19T12:30:36+5:302023-03-19T14:02:53+5:30
बारा प्रवासी जखमी झाले असून त्यांना तीन रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे
पुणे : पुण्यातील बावधन येथे सीएनजी पेट्रोल पंपाजवळ मुंबईकडून बेंगलोरकडे जाणाऱ्या एका खाजगी बसचा अपघात झाला आहे. बावधन येथे मुख्य रस्त्यावरुन सेवा रस्त्यावर जात असताना चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्यामुळे बस १५ ते २० फूट खाली कोसळली असल्याची माहिती मिळत आहे. या अपघातामध्ये बारा प्रवासी जखमी झाले आहेत. हा अपघात शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडला.
बसमध्ये एकूण ३६ प्रवासी होते. त्यापैकी १२ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना चेलाराम हॉस्पिटल बावधन, सिंबोसिस हॉस्पिटल लवळे, व ससून हॉस्पिटल अशा तीन हॉस्पिटल मध्ये जखमींना उपचारासाठी भरती केले आहे. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला. ही बस बायपासवरून साधारण १५ फूट खाली कोसळली आणि पलटी झाली. अपघात झालेल्या परिसरातील रस्त्याच्या कडेला दिव्यांचा अभाव असल्यामुळे हा अपघात झाला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, या अपघातामुळे चौंदणी चौक परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी जवळपास अर्ध्या तासानंतर या ठिकाणची वाहतूक व्यवस्था सुरळीत केली.