पुण्यातील मंडळाचा अभिमानास्पद उपक्रम! दहीहंडीचा अतिरिक्त खर्च टाळून अंध महिला आश्रमला मदत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2022 02:43 PM2022-08-19T14:43:22+5:302022-08-19T14:43:36+5:30
दहीहंडी उत्सव साजरा करीत अतिरिक्त खर्च टाळून उरलेल्या रकमेतून सामजिक कार्यात खारीचा वाटा उचलला
धायरी : दहीहंडी उत्सवासाठी उभारले जाणारे फ्लेक्स किंवा सेलिब्रेटी आणण्यासाठी लागणारा वायफळ खर्च कमी करून सिंहगड रस्त्यावरील एका अंध महिला आश्रमाला मदत देत नांदेडगावातील अखिल लक्ष्मीनारायण मित्र मंडळाने स्तुत्य उपक्रम केला. दहीहंडीच्या माध्यमातून आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इच्छुकांकडून शक्तिप्रदर्शन करण्यात येत असून शहरभर दहीहंडी साजरी करणाऱ्या मंडळांनी फ्लेक्स लावले आहेत.
सिनेतारकांची उपस्थिती, दहीहंडी पथकांवर देण्यात येणारी बक्षिसे, रोषणाईवर लाखो रुपयांचा खर्च करण्यात येत आहे, असे असताना सिंहगड रस्त्यावरील एका मंडळाने मात्र साध्या पद्धतीने दहीहंडी उत्सव साजरा करीत अतिरिक्त खर्च टाळून उरलेल्या रकमेतून सामजिक कार्यात खारीचा वाटा उचलला आहे.
नांदेड फाटा परिसरातील दळवीवाडी येथे शिर्डी साई बाबा संस्थान अंध महिला आश्रम आहे. या आश्रमातील अंध महिलांना नांदेडगाव येथील अखिल लक्ष्मीनारायण मित्र मंडळ, एकदंत प्रतिष्ठान वतीने अन्नधान्य व फळे वाटप केली. सिंहगड रस्ता वाहतूक विभागाचे सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत कणसे, भाजपा युवा मोर्चा खडकवासला मतदारसंघाचे संघटन सरचिटणीस सारंग नवले, बांधकाम व्यावसायिक किरण सावंत, निखिल घुले तसेच मंडळातील सर्व सदस्य उपस्थित होते.