बारामतीत अल्पसंख्यांक समाजाच्या विकासासाठी सव्वा दहा कोटी मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2022 08:58 PM2022-04-04T20:58:07+5:302022-04-04T20:58:19+5:30
ग्रामीण बहुल क्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत निधी उपलब्ध
सांगवी : बारामती तालुक्यातील अल्पसंख्यांक समाजाच्या विकास कामांसाठी सव्वा दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष संभाजी होळकर यांनी दिली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अल्पसंख्यांक विकास विभाग या योजनेतून बारामती तालुक्यातील अल्पसंख्यांक समाजाच्या विकासकामांसाठी १० कोटी २० लाख रुपयांची विविध विकासकामे मंजूर केली आहेत. यामुळे बारामती तालुक्यातील विकासकामांना आणखी गती मिळाली आहे.
गावपातळीवरील कब्रस्तान संरक्षण भिंत बांधणे,सुशोभीकरण करणे,शादीखाना बांधणे, सामाजिक सभागृह बांधणे,वस्तीवरील रस्ता व भूमिगत गटारे करणे, अशा विविध कामांसाठी निधी उपलब्ध झाला आहे. तालुक्यातील जवळपास ३० ते ३५ गावातील कब्रस्तानची कामे मार्गी लागणार आहेत.
राज्यातील अल्पसंख्याक बहुल ग्रामीण क्षेत्रात मूलभूत पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी अनुदान वितरित करण्यास मंजूरी देण्याबाबत ग्रामीण भागात वास्तव्यास असलेल्या अल्पसंख्याक लोकसमुहातील नागरिकांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावण्यासाठी ग्रामीण क्षेत्र विकास कार्यक्रम कार्यान्वित करण्यास मंजूरी देण्यात आली आहे.
त्यानुसार खासदार,आमदार तसेच जिल्हाधिकारी यांच्याकडून शासन मान्यतेसाठी ग्रामपंचायत प्रस्तावांना मंजूरी देऊन सन २०२१-२२ या आर्थिक वर्षात अर्थसंकल्पित निधी आणि पुरवणी मागणीद्वारे उपलब्ध करुन दिलेल्या तरतूदीपैकी निधी वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. राज्यातील अल्पसंख्याक बहुल ग्रामीण क्षेत्र विकास योजनेकरिता सन २०२१-२२ या आर्थिक वर्षात ५९ कोटी ३६ छत्तीस लाखांचा निधी अर्थसंकल्पित करण्यात आला असून पुरवणी मागणीद्वारे १०० कोटी असे एकूण १५९ कोटी ३६ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यानुसार बारामती तालुक्यातील विकासकामांसाठी सव्वा कोटी रुपए मंजूर करण्यात आले आहे. सदर अनुदान संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्यामार्फत संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद,सार्वजनिक बांधकाम विभाग,सार्वजनिक बांधकाम जिल्हा परिषद यांच्या स्वाधीन करण्यात आली आहे.