लवकर तोडगा काढणे आवश्यक; केवळ आर्थिक निकषांवरच आरक्षण द्यायला हवे, रामदास फुटाणेंचे परखड मत
By श्रीकिशन काळे | Published: October 29, 2023 03:39 PM2023-10-29T15:39:23+5:302023-10-29T15:40:31+5:30
खरंतर मराठ्यांमध्ये सर्वच चांगले पैसेवाले, सुबत्ता असलेले लोक नाहीत, आता मराठा जातीमध्येही गरीब लोकं आहे.
पुणे: सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत आहे. खरंतर मराठ्यांमध्ये सर्वच चांगले पैसेवाले, सुबत्ता असलेले लोक नाहीत. आता मराठा जातीमध्येही गरीब लोकं आहे. त्यांच्यासाठी हे आरक्षण मागत आहेत. त्यामुळे यावर लवकर तोडगा काढणे आवश्यक आहे. तसेच २०४७ ही जातीय आरक्षणाची सीमारेषा ठरवायला हवी. यापुढे केवळ आर्थिक निकषांवरच आरक्षण द्यायला हवे, असे परखड मत ज्येष्ठ वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांनी व्यक्त केले.
आचार्य प्र. के. अत्रे यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्षानिमित्त महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे, कोहिनूर ग्रुप आणि विदिशा विचार मंच, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने २०२३-२०२४ या वर्षभरात 'प्रतिभेचं लेणं...' हा वार्षिक महोत्सव होत आहे. त्यानिमित्त ज्येष्ठ वात्रटिकाकार आणि विडंबनकार रामदास फुटाणे यांना रविवारी कोहिनूर ग्रुपचे मुख्य कार्यकारी संचालक कृष्णकुमार गोयल आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते 'प्रतिभेचं लेणं...' सन्मान प्रदान केला. विदिशा विचार मंचच्या संस्थापक-संचालक ममता क्षेमकल्याणी यांनी फुटाणे यांच्याशी संवाद साधला. यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणेच्या प्रभारी प्रमुख कार्यवाह आणि कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार उपस्थित होत्या.
प्रा. मिलिंद जोशी म्हणाले की, फुटाणे यांची भाष्यकविता ही महाराष्ट्राच्या राजकारणाची आणि समाजकारणाची श्वेतपत्रिका आहे. भाष्यकविता लिहिण्यासाठी कवीची प्रतिभा, विनोद बुद्धी, समाजाविषयी कळकळ आणि मुख्य म्हणजे धाडस असावे लागते. विनोदाचे बोट पकडून फुटाणे यांच्या भाष्यकवितेने समाजातील ढोंगावर आणि दंभावर प्रहार करून उद्वेग, चीड, असंतोष, अस्वस्थता आणि असहायता व्यक्त केली आहे.
फुटाणे म्हणाले की, मी लहानपणी गावात गरीबी अनुभवली आहे. त्यानंतर मुंबईत राहताना उच्चभू शाळेत शिकलो. समाजामधील गरीब-श्रीमंत ही विसंगीत मला अनुभवायला मिळाली. घरात काँग्रेसी विचारधारेची परंपरा होती. पण मला समाजवाद आणि काँग्रेसी विचारधारा दोन्ही एका टप्प्यापर्यंत आवडत होते. नंतर चित्रपट क्षेत्रात काम करू लागल्यावर भालजी पेंढराकरांकडून हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्वाचे धडे मिळाले. निळू फुलेंबरोबरच्या गप्पांमधून लोहियावादी समाजवादी विचार समजू लागले.