Blue Nawab: ब्लू नवाब या दुर्मिळ फुलपाखराचे सह्याद्रीमधील आंबोली जंगलात दर्शन
By श्रीकिशन बलभीम काळे | Published: September 22, 2022 03:22 PM2022-09-22T15:22:56+5:302022-09-22T15:26:48+5:30
महाराष्ट्रात हे फुलपाखरू दिसण्याची ही पहिलीच नोंद असल्याचा दावा अभ्यासकांनी केला....
पुणे : प्रदेशनिष्ठ आणि पश्चिम घाटातही दुर्मिळ असणारे ब्लू नवाब हे फुलपाखरू आंबोलीतील जंगलात पहायला मिळाले आहे. महाराष्ट्रात हे फुलपाखरू दिसण्याची ही पहिलीच नोंद असल्याचा दावा अभ्यासकांनी केला आहे. संवर्धनासाठी हे फुलपाखरांमध्ये उच्च स्थानी आहे, कारण हे खूपच दुर्मिळ आहे.
आबासाहेब गरवारे महाविद्यालयातील डॉ. अण्णासाहेब कुलकर्णी जैवविविधता विभाग प्रमुख डॉ. अंकुर पटवर्धन, प्रतीक्षा मेस्त्री, अथर्व दातार, मुकुल कुंटे, शिवानी कुलकर्णी, ऐश्वर्या शिर्के आणि फुलपाखरू अभ्यासक हेमंत ओगले हे आंबोलीत फुलपाखरांचा अभ्यास करत होते. तेव्हा प्रतीक्षा हिला तो ब्लू नवाब पहिल्यांदा दिसला. त्याचे छायाचित्र काढण्यात आले आणि यापुर्वीची नोंद तपासली. तेव्हा महाराष्ट्रात पहिल्यांदाच दिसल्याचे आढळून आले.
याविषयी डॉ. पटवर्धन म्हणाले, भारतात हे फुलपाखरू खूप दुर्मिळ आहे. सहसा दिसत नाही. त्याचा अधिवास खूप खास असतो. तो सदाहरित वनात नदीच्या काठी आढळतो. जिथे खूप झाडी असते. झरे, ओहोळ अशा ठिकाणी हे फुलपाखरू पहायला मिळते. त्या ठिकाणी याचा अधिवास असतो. याच्या तीन जाती आहेत. भारतात तीन ठिकाणीच दिसतात. ईशान्य भारतामध्ये खासी हिल्स येथे, मलबार प्रदेशात आणि पश्चिम घाटात. या फुलपाखराला शेड्युल वन मध्ये संरक्षण आहे. अतिसंरक्षण यादीत समावेश आहे.
फुलपाखरे आणि फुलणाऱ्या वनस्पतींमधील आवडी निवडी याबद्दल संशोधन करताना '' कापशी '' या वनस्पतीवर सुमारे ५० फुलपाखरांच्या प्रजाती भेट देताना दिसल्या. याशिवाय माशा, मधमाशा आणि पतंगाच्याही विविध जाती होत्या. पश्चिम घाटात ही कापशी वनस्पती दिसून येते.
आंबोलीचे जंगलात खूप जैवविविधता आहे. तिथे १९० हून अधिक फुलपाखरांच्या प्रजाती पहायला मिळतात. त्यात आता या दुर्मिळ ब्ल्यू नवाबची भर पडली आहे. तसेच इथे आॅटम लिफ आणि क्रुझर या दुर्मिळ फुलपाखरांचीही नोंद झाली आहे.
- डाॅ. अंकुर पटवर्धन, फुलपाखरू संशोधक