‘ब्लू नवाब’ या दुर्मीळ फुलपाखराचे सह्याद्रीत दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2022 06:07 AM2022-09-23T06:07:43+5:302022-09-23T06:08:24+5:30
महाराष्ट्रात पहिली नोंद असल्याचा फुलपाखरू अभ्यासकांचा दावा
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : प्रदेशनिष्ठ आणि पश्चिम घाटातही दुर्मीळ असणारे ‘ब्लू नवाब’ हे फुलपाखरू आंबोलीतील जंगलात पाहायला मिळाले आहे. महाराष्ट्रात हे फुलपाखरू दिसण्याची ही पहिलीच नोंद असल्याचा दावा अभ्यासकांनी केला आहे. संवर्धनासाठी हे फुलपाखरांमध्ये उच्चस्थानी आहे. कारण हे खूपच दुर्मीळ आहे.
आबासाहेब गरवारे महाविद्यालयातील जैवविविधता विभागप्रमुख डॉ. अंकुर पटवर्धन, प्रतीक्षा मेस्त्री, अथर्व दातार, मुकुल कुंटे, शिवानी कुलकर्णी, ऐश्वर्या शिर्के आणि फुलपाखरू अभ्यासक हेमंत ओगले हे आंबोलीत फुलपाखरांचा अभ्यास करत होते. तेव्हा प्रतीक्षा हिला ‘ब्लू नवाब’ पहिल्यांदा दिसले.
nभारतात हे फुलपाखरू दुर्मीळ आहे. त्याचा अधिवास खूप खास असतो. ते सदाहरित वनात नदीच्या काठी जिथे झरे, ओहोळ याठिकाणी हे फुलपाखरू पाहायला मिळते.
आंबोलीच्या जंगलात खूप जैवविविधता आहे. तिथे १९०हून अधिक फुलपाखरांच्या प्रजाती पाहायला मिळतात. त्यात आता या दुर्मीळ ‘ब्ल्यू नवाब’ची भर पडली आहे. तसेच इथे ‘ऑटम लिफ’ आणि ‘क्रुझर’ या दुर्मीळ फुलपाखरांचीही नोंद झाली आहे.
- डाॅ. अंकुर पटवर्धन, फुलपाखरू संशोधक