Pune Bopdev Ghat News: 'त्या' नराधमांची माहिती देणाऱ्यास दहा लाखांचे बक्षीस जाहीर; बोपदेव घाट संतापजनक प्रकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2024 02:46 PM2024-10-07T14:46:17+5:302024-10-07T14:47:53+5:30
आतापर्यंत २०० हुन अधिक सराईतांची चौकशी झाली असून बोपदेव घाटापासून ७० ते ८० किलोमीटर अंतरापर्यंत शंभर ठिकाणचे सीसीटीव्ही तपासणार
पुणे : बोपदेव घाटात तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणात पोलिसांनी संशयित आरोपींच्या वर्णनावरून त्यांचे स्केच तयार केले आहे. तसेच सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीनेदेखील पोलिस तपास करत आहेत. तसेच आरोपींचा शोध घेण्यासाठी तीन हजार मोबाइल वापरकर्त्यांची माहिती पोलिसांकडून संकलित करण्यात येत आहे. त्याआधारे पोलिसांकडून तांत्रिक विश्लेषण सुरू करण्यात आले आहे. पोलिसांकडून दोनशेहून अधिक सराईतांची चौकशी करण्यात येणार आहे. आरोपीची माहिती देणाऱ्यास दहा लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले आहे. पोलिसांकडून एआय (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे.
बोपदेव घाट हा परिसर निर्जन आहे. या भागात सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत, तसेच तांत्रिक अडचणींमुळे मोबाइल विश्लेषण करण्यात अडथळे आले आहेत. आरोपी बोपदेव घाटातून सासवडकडे गेल्याचा संशय आहे. बोपदेव घाटापासून ७० ते ८० किलोमीटर अंतरापर्यंत शंभर ठिकाणचे सीसीटीव्ही चित्रीकरण संकलित करण्यात येणार आहे.
गेल्या १५ दिवसांत बोपदेव घाट मार्गे गेलेल्या तीन हजार मोबाइल वापरकर्त्यांची माहिती पोलिसांकडून संकलित करण्यात येत आहे. त्याआधारे पोलिसांकडून तांत्रिक विश्लेषण सुरू करण्यात आले आहे. बोपदेव घाटापासून ७० ते ८० किलोमीटरपर्यंत सीसीटीव्ही चित्रीकरण संकलित करण्यात येणार आहे. दोनशेहून अधिक सराईतांची चौकशी सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती परिमंडळ ५ चे पोलिस उपायुक्त आर. राजा यांनी दिली.
पुण्यातील सर्व टेकड्यांवर लाईट अन् सायरन बसवणार
बोपदेव घाटात तरुणीवर तिघांनी केलेल्या सामूहिक अत्याचारानंतर आता शहरातील सर्व टेकड्यांवर सर्च लाईट बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच सर्व टेकड्यांवर सायरन बसवले जाणार आहे. टेकड्यांवर होणाऱ्या चोऱ्या, लूट थांबवण्यासाठी पुण्यातील सर्व टेकड्यांवर सर्च लाईट बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जेथे वीजपुरवठा नाही, अशा टेकडीवर पोलिस मदत केंद्र उभारले जाईल. तेथे पोलिस वाहनांना सर्च लाईट देण्यात येईल. ती वाहने अशा टेकडीवर असतील. महापालिकेला सांगून या टेकडीवर वीजपुरवठा करण्यात सांगण्यात येणार आहे. जेथे जेथे अशा घटना झाल्या, त्या टेकडीवर सर्च लाईट उभारले जातील अशी माहिती सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी दिली.