रिक्षाचालकाची मुलगी झाली 'सीए'; प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर मिळविले पहिल्याच प्रयत्नात यश

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2022 04:11 PM2022-07-18T16:11:08+5:302022-07-18T16:11:19+5:30

धनकवडीतील प्रियांका चंदनशिव या विद्यार्थिनीने जिद्दीला अभ्यासाची जोड देत मिळवले यश

A rickshaw puller's daughter became CA Success in the very first attempt achieved by sheer force of will | रिक्षाचालकाची मुलगी झाली 'सीए'; प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर मिळविले पहिल्याच प्रयत्नात यश

रिक्षाचालकाची मुलगी झाली 'सीए'; प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर मिळविले पहिल्याच प्रयत्नात यश

Next

पांडुरंग मरगजे

धनकवडी : कोणतेही स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रचंड इच्छाशक्ती आणि जिद्दीला आपल्या प्रामाणिक कष्टाची जोड दिल्यास आकाशालाही गवसणी घालता येते. याचाच प्रत्यय नुकताच धनकवडीतील प्रियांका चंदनशिव या विद्यार्थिनीने आपल्या कर्तृत्वाने दाखवून दिला आहे. घरची परिस्थिती नाजूक असताना देखील आपल्या जिद्दीला अभ्यासाची जोड देत संपूर्ण देशात अवघड समजल्या जाणाऱ्या सीए (सनदी लेखापाल) ची परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उतीर्ण होण्याची किमया केली आहे. त्यामुळे तिच्यावर विविध स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

मूळचे भोर तालुक्यातील किवत या गावचे रहिवासी असलेले गुलाब चंदनशिव हे परिवाराच्या उदरनिर्वाहासाठी पुण्यात आले. व धनकवडीत स्थायिक झाले.  त्यासोबतच त्यांनी उपजीविकेचे साधन म्हणून रिक्षा व्यवसाय निवडला. त्यातून होणाऱ्या अर्थप्राप्तीवरच आजही ते आपला परिवार चालवत आहेत. पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा असा त्यांचा परिवार आहे. प्रियांका ही त्यांची लहान मुलगी.

तिचे प्राथमिक शिक्षण धनकवडीतील बालविकास शाळेत तर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण भोर येथील राजा रघुनाथराव विद्यालयात मराठी माध्यमातून झाले. स्वत: सुशिक्षित असलेल्या गुलाब चंदनशिव यांनी आपल्या नाजूक परिस्थितीची सबब न सांगता परिवाराच्या उदरनिर्वाहासोबतच मुलांचा शिक्षणाकडे विशेष लक्ष दिले. त्यामुळेच मोठी मुलगी इंजिनिअर आणि लहान मुलगी सीए (सनदी लेखापाल) झाली असून मुलगा महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे.

पहिल्यापासूनच अभ्यासात हुशार असणाऱ्या प्रियांकाला सीए होण्याची मनोमन इच्छा होती. तेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून रोज आठ ते दहा तास अभ्यासाचे योग्य नियोजन करून तिने हे अभूतपूर्व यश संपादन केले आहे.

यावेळी प्रियांकाने सांगितले की, “मला हे यश मिळविण्यासाठी माझे आई, वडील आणि कुटुंबीयांकडून नेहमीच सकारात्मक पाठिंबा मिळाला. तर सर्व शिक्षक आणि मित्र परिवाराकडून योग्य असे मार्गदर्शन मिळाले. त्यांचे मी आभार व्यक्त करते. या सर्वांमुळेच मी पहिल्या प्रयत्नामध्ये एवढी अवघड परीक्षा उतीर्ण झाले.'' 

Web Title: A rickshaw puller's daughter became CA Success in the very first attempt achieved by sheer force of will

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.